22 November 2009

शिवसेनेची गोची

लोकसभा निवडणुकीबरोबरच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे आम्हाला कोणतेही आव्हान नाही, मनसेचा बुडबुडा विधानसभा निवडणुकीत फुटेल, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मनसेला मत देऊन जी चूक केली ती आता ते  करणार नाहीत, एकवेळ कॉंग्रेसला मत द्या पण मनसेला देऊ नका, अशी  आणि अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चौकडीतून केली गेली. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले. अनेक ठिकाणी दुसऱया क्रमांकाची मते घेतली. मुंबईत तर शिवसेना पार भुईसपाट झाली. तरीही उद्धव ठाकरे आणि त्यांचे ढोल वाजवणाऱया पित्यांचे डोळे उघडत नाहीत, याला काय म्हणायचे. मनसे आणि त्यांनी उचलून धरलेल्या मराठीच्या मुद्यामुळे शिवसेनेची  पार गोची झाली आहे. नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत शिवसेना नेतृत्व संभ्रमावस्थेत सापडले आहे आणि त्यातूनच धरले तर चावते आणि सोडले तर पळते किंवा करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.


विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून त्याचे खापर सर्वसामान्य मराठी माणसांवरच फोडले गेले. मुळात निकाल लागल्यानंतर चार ते पाच दिवसांनी उद्धव ठाकरे हे प्रसारमाध्यमांना  सामोरे गेले. खऱे तर निकाल लागल्यानंतर लगेचच त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन झाले ते झाले, आमचे कुठे  चुकले त्याचे आत्मपरिक्षण आम्ही करु आणि झालेल्या चुका सुधारु, असे जाहीर वक्तव्य करायला हवे होते. भाजपच्या मुंडे व गडकरी यांनी तसे वक्तव्य केले. निकाल लागल्यानंतर तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर आला नाहीत, तेथेच पहिल्यांदा चुकले. त्यानंतर सामनामध्ये अग्रलेखाद्वारे मराठी माणसांनी पाठीत खंजीर खुपसला असे विधान करून समस्त मराठी माणसांची नाराजी ओढवून घेतली. त्या विधानावर गदारोळ झाल्यानंतही उद्धव ठाकरे यांनी त्याचे समर्थन केले होते. बरे सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणसाला ते विधान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केले असे वाटले. पण शिवसेनाभवनात बाळासाहेब ठाकरे यांनीच त्याचा खुलासा केला आणि मी असे बोललेलोच नाही, असे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे, सामनाचे संपादक संजय राऊत उघडे पडले. 


त्यानंतर मराठीतून शपथ घेण्याच्या मुद्यावरुनही मनसेने बाजी मारली. भर विधानसभेत अबू आझमी याला मनसेच्या आमदारांनी चोपले. तेव्हाही शिवसेनेला नेमकी काय भूमिका घ्यावी ते कळले नाही. मात्र त्यामुळे मनसेची भूमिका पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठी मनापर्यंत पोहोचली. खरे तर हा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेला उचलून धरायला काहीच हरकत नव्हती. किंवा मनसेने तो लावून धरल्यानंतर किमान मराठीच्या मुद्दयावर तरी त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. विधानसभेत अबूचा चोपले ते बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण मराठीतून शपथ घेणे या मुद्द्यावर तरी शिवसेनेने मनसेला जाहीरपणे समर्थन द्यायला हवे होते.


त्यानंतर सचिन तेंडुलकर याच्या विधानावरुन शिवसेना पुन्हा एकदा गोत्यात आली. मी मराठी असलो तरी पहिल्यांदा भारतीय आहे, असे विधान त्याने केले होते. त्यावर शिवसेनेने सामनामधून सचिनवर दुगाण्या झाडल्या. कदाचित हा मुद्दा मनसेने उचलला तर, या भीतीपोटी आपण पहिल्यांदा प्रतिक्रिया देऊ या, असे वाटून शिवसेनेने जाहीर भाष्य केले आणि देशभरातून तसेच महाराष्ट्रातूनही शिवसेनेवर जोरदार टिका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला अखेर नमते घ्यावे लागले आणि शिवसेनाप्रमुखांनी सचिनला वडिलकीच्या नात्याने हा सल्ला दिला अशी सारवासारव करावी लागली.


आणि आता नुकताच घडलेला आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीवरील हल्ल्याचा प्रकार. मुळात अशा प्रकारे हल्ला करणे आणि त्यानंतर त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे हे चुकीचे आहे. निखिल वागळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून जर काही अपशब्द वापरले असतील तर त्याचा तीव्र निषेध तुम्हाला तुमच्या सामना या मुखपत्रातून करता आला असता. सामना कोणी वाचत नाही , याची तुम्हाला खात्री वाटत होती तर तुमचे या बाबतीतील निवेदन जाहिरातीच्या स्वरुपात सर्वाधिक खप असलेल्या अन्य मराठी वृत्तपत्रातून द्यायला हवे होते. किंवा किमान तुमचा खुलासा व वागळे यांच्या वक्तव्यावर तुमचे म्हणणे आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीला पाठवून द्यायला हवा होता. पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी होती ते करुनही वागळे यांनी दिलगिरी व्यक्त केली नसती तर या वाहिनीच्या कार्यालयासमोर शिवसैनीकांची शांततापूर्ण निदर्शने, काळ्या फिती लावून धरणे आंदोलन किंवा लाक्षणिक उपोषण करता आले असते, प्रेस कौन्सीलकडेही तक्रार करता आली असती.जेव्हा शिवसेनाप्रमुखांनी पत्रकारांना उद्देशून घुबड, कावळे असे अपशब्द वापरले होते, पु. ल. देशपांडे यांचाही अवमानकारक शब्दात अपमान करण्यात आला होता आणि वेळोवेळी शिवसेनेकडून किंवा त्यांच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून इतरांवर अशी जहरी टीका करण्यात आली, तेव्हा संजय राऊत यांची लेखणी आणि तोंड का मूग गिळून बसले होते. म्हणजे आम्ही काहीही लिहू, कोणाच्या विरोधात काहीही बोलू, तुम्ही मात्र आमच्या विरोधात काहीही बोलायचे नाही, ही कोणती पद्धत झाली.


 मात्र  यापैकी कोणताही सनदशीर मार्ग न अवलंबता थेट कार्यालयावर हल्ला चढवणे, कार्यालयाची नासधूस कऱणे, कर्मचाऱयांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील राडा संस्कृती संपवली, वेगळ्या वाटेने आणि विचारांने शिवसेनेला नेतृत्व दिले, उद्धव ठाकरे हे कसे सुसंस्कृत आहेत,  म्हणून त्यांचे गोडवे गायले जात होते. मग शिवसेनेला पुन्हा राडा संस्कृतीकडे का वळावेसे वाटले, त्याचे उत्तर संजय राऊत देणार आहेत का, झाल्याप्रकाराबद्दल उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असे अनेक प्रश्न शिवसेना वर्तुळात उपिस्थत केले जात आहेत.


सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या भारताबाहेर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत असा हल्ला करण्याचा निर्णय कोणी घेतला, की त्यालाही उद्धव ठाकरे यांचे समर्थन घेतले होते. झाल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले तोंड उघडलेले नाही. तसेच शिवसनेच्या अन्य नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनीही आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. एकटे संजय राऊत या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. कदाचित त्यांचा भाऊ सुनील या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार असल्याने, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्याला उमेदवारी मिळवून देऊन त्याचा पराभव झाल्यामुळे काहीतरी करुन दाखविण्याच्या हेतूने सुनील राऊत यांनी हे कृत्य केले असावे किंवा तसे करण्यास त्यांना कोणी सल्ला दिला असावा. मात्र प्रत्यक्षात हे शिवसेनेला चांगलेच जड जाणार आहे. कदाचित सख्खा भाऊ यात गुंतल्यामुळे संजय राऊत यांना त्याची पाठराखण करणे भाग पडले असावे, असे वाटते.


एवढे सगळे घडून गेल्यानंतरी आता तरी उद्धव ठाकरे यांनी डोळे उघडावे. आपल्याभोवती जमलेल्या चौकडीकडून आपल्याला जो सल्ला दिला जातो, जी रणनिती आखण्यासाठी सांगितले जाते, ते साफ चुकीचे ठरत आहे. त्यामुळे आपल्याला आणि शिवसेनेनाही त्याचा कोणताच फायदा होत नाही तर उलट तोटाच होतो आहे. हे लक्षात घ्यावे. शिवसेनेतील जुने व ज्येष्ठ नेते आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी आपला संवाद वाढवावा. आपले नेमके कुठे चुकते आहे, ते प्राणाणिकपणे हीच मंडळी त्यांना सांगू शकतील. अजनुही वेळ गेलेली नाही. भोवती जमलेल्या तीन राऊत आणि एक नार्वेकर यांच्या तसेच चुकीचे सल्ले देऊन गोत्यात आणणाऱया खुषमस्कऱयांच्या तावडीतून वेळीच बाहेर पडावे अन्यथा जाग येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल...                             

6 comments:

 1. परखड आणि योग्य विवेचन केले आहे.

  ReplyDelete
 2. आज़ सगळ्यांनाच राज ठाकरे यांचा पुळका येतो आहे. पण शिवसेना, मग ती राजची असो की उद्‌धवची, हा एक आपला ठक आहे, आणि तसा असला तरी तत्त्वाशी फार प्रामाणिक नसलेला, संधीसाधू पक्ष आहे. याचा विसर न पडू दिलेला बरा.

  ReplyDelete
 3. "सामना कोणी वाचत नाही , याची तुम्हाला खात्री वाटत होती तर तुमचे या बाबतीतील निवेदन जाहिरातीच्या स्वरुपात सर्वाधिक खप असलेल्या अन्य मराठी वृत्तपत्रातून द्यायला हवे होते." - झकास!

  ReplyDelete
 4. अनामिक आणि कपील यांना,
  नमस्कार
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
  शेखर

  ReplyDelete
 5. jabardast sir , khar tar samna madhli tika yogya kivha sarvani manya keli pahije ani dusryani keli tar amhi naganach karnar hi pravruti shivsenecha rhas honyas adhik hatbhar lavel he nischit

  ReplyDelete