21 November 2009

बृहन्मंबई महापालिकेत आत्तापर्यंत १२ अमराठी आयुक्त

मनसेने ‘मराठी’चा मुद्दा लावून धरल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डॉ. जयराज फाटक यांच्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मराठी की अमराठी आयुक्ताची नियुक्ती होणार त्याविषयी विविध तर्क सुरु आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गेल्या ६३ वर्षात बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी १२ अमराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.


 याची सुरुवात बी. के. पटेल यांच्यापासून झाली. त्यानंतर अधूनमधून अमराठी अधिकारी आयुक्त म्हणून महापालिकेवर नियुक्त केले गेले. पटेल यांचा कालावधी २१ जानेवारी १९४६ ते २० सप्टेंबर १९५२ असा होता. त्यांच्यानंतर पी. आर. नायक यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. व्ही. एल. गिडवानी यांना अगोदर दीड महिन्याचा आणि नंतर १५ जुलै १९५७ ते २९ एप्रिल १९६० असा कार्यकाळ मिळाला होता.


 २८ फेब्रुवारी १९६२ ते १५ एप्रिल १९६३ अशा काळात ए.यू. शेख हे आयुक्त झाले. ७ मे १९६९ ते २४ मार्च १९७० या कालावधीत जे. बी. डिसोझा हे आयुक्त होते. १९७५ ते १९८४ या कालावधीत भालचंद्र देशमुख, बी. के. चौगुले आणि द.म. सुखटणकर असे मराठी आयुक्त झाले. १२ नोव्हेंबर १९८४ ते २४ जुलै १९८६ अशी दोन वर्षे पुन्हा जे. के. कांगा हे अमराठी आयुक्त होऊन गेले.


त्यांच्यानंतर २४ जुलै १९८६ ते ३० एप्रिल १९९० या काळात सदाशिवराव तिनईकर हे आयुक्त झाले. तिनईकर यांच्यानंतर पुन्हा एकदा के. पद्मनाभय्या यांच्या रुपाने महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाला. पद्मनाभय्या यांच्यानंतर शरद काळे (१६ नोव्हेंबर १९९१ ते १७ मे १९९५), जर्नादन जाधव (१७ मे १९९५ ते १० जून १९९६) आणि गिरीश गोखले (१० जून १९९६ ते ३१ मे १९९९) असे तीन मराठी आयुक्त झाले. यांच्यानंतर लागोपाठ पाच वर्षे पुन्हा महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाले.


 के. नलीनाक्षन, व्ही. रंगनाथन, रामानंद तिवारी, करुण श्रीवास्तव व जॉनी जोसेफ या अमराठी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. के. नलीनाक्षन यांची १ जून १९९९ रोजी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. तर जॉनी जोसेफ हे १ मार्च २००४ ते १ मे २००७ या कालावधीत आयुक्त होते. जोसेफ यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉ. जयराज फाटक यांच्या रुपाने महापालिकेला मराठी आयुक्त मिळाला. डॉ. फाटक यांच्या बदलीनंतर आता पुन्हा एकदा या पदावर कोणाची नियुक्ती होणार त्याची चर्चा सुरु झाली आहे.

No comments:

Post a Comment