28 November 2009

सांगा कसं जगायचं

काही दिवसांपूर्वी मी हे जीवन सुंदर आहे या शीर्षकाअंतर्गत ब्लॉगवर लेखन केले होते. जीवनात अनेक दुख, अडचणी असल्या, जीवन हे क्षणभंगूर असले तरीही आपण प्रत्येकाने आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवावा, उद्याच्या भविष्याची काळजी करण्यात आजचा क्षण वाया घालवू नये, असे लिहिले होते. खरे तर त्याच्या दुसऱयाच दिवशी या विषयासंदर्भातील काही गाणी येथे द्यायची होती. पण दुसऱया विषयावर लेखन केले आणि ते राहून गेले. आज त्याविषयी...जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील एक छान गाणे मला पटकन आठवले. शरद तळवलकर यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे सगळे शब्द मला मिळाले  नाहीत. माझ्या आठवणीप्रमाणे सुधीर फडके यांचा आवाज या गाण्याला आहे.


हाती नाही येणे

हाती नाही जाणे

हसत जगावे, हसत मरावे

हे तर माझे गाणे

असे गाण्याचे ध्रुवपद आहे.


हे गाणे मला खूप आवडते. जणू काही जीवनाचे सर्व सार आणि जीवन कसे जगा, याचेच मार्मिक वर्णन यात केलेले आहे.

असेच आणखी एक गाणे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील तेही हे जीवन सुंदर आहे या विषयाशी निगडीत आहे. ते म्हणजे

व्यथा असो आनंद असू दे

प्रकाश किंवा तिमिर असू दे

वाट दिसो अथवा न दिसू दे,

जात पुढेच रहाणे.

माझे जीवनगाणे


मंगेश पाडगावकर यांचेच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गाणेही छान आहे. अरुण दाते यांचा स्वर या गाण्याला लाभला आहे.

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावरकर यांची याच विषयावरची आणखी एक  कविता.  अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून पाडगावकर यांनी या कवितेचे वेळोवेळी वाचन केले आगे. सांगा कसं जगायचं ही ती कविता. ती मात्र मला मिळाली. आपल्या माहितीसाठी ती कविता...


सांगा कस जगायचं?


कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण

कोणीतरी काढतंच ना?

ऊन ऊन दोन घास

तुम्च्यासाठी वाढतंच ना?

शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं

तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात

जेव्हा काही दिसत नसतं

तुमच्या साठी कोणीतरी

दीवा घेऊन उभं असतं

कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं

तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात

हे अगदी खरं असतं;

आणि फ़ुलं फ़ुलुन येतात

हे काय खरं नसतं?

काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं

तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.


ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीतकार यशवंत देव हे त्यांच्या कार्यक्रमातही ही कविता सादर करतात. देव यांनी गाण्याला सहज, सोपी चाल लावली आहे. त्यामुळे खुद्द पाडगावकर यांच्या आवाजात आणि देव यांच्याही आवाजात कवितेचे गाणे खूप छान वाटते. मनावर आलेली मरगळ, जीवनात आलेले नैराश्य या कवितेने दूर निघून जाते.   

4 comments:

 1. आत्ता मी प्रथमेशच्या आवाजातले माझे जीवनगाणेच ऐकतेय.

  ReplyDelete
 2. भाग्यश्री
  नमस्कार
  योगायोग आहे. आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
  शेखर

  ReplyDelete
 3. खुपच छान.

  एक सुचना - "ब्लॉगवरील लेखांचा अनुक्रम" वर सरकवला तर फार बरे होईल. म्हणजे बाकी लेख शोधायला खाली शोधावे लागणार नाही. पटली तर बघा, नाहीतर सोडुन द्या. :)

  धन्यवाद.

  ReplyDelete
 4. सूचना चांगली आहे. जरुर विचार करतो. वेळोवेळी मिळणाऱया प्रतिसादाबद्दल आभार.
  शेखऱ

  ReplyDelete