04 February 2010

मराठीची वज्रमुठ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत झालेल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा मराठीचा राग आळवत मराठी बाणा, मराठी भाषा आणि संस्कृती यांची जपणूक करण्याचा राजमंत्र सांगितला.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य माणसांनी मतभेद आणि पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. मराठीची वज्रमुठ केली तर कोणाचीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही.


राज ठाकरे यांनी जनमानसाची नाडी नेमकी ओळखलेली आहे. कुठे, कसे आणि किती बोलायचे हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळेच डोंबिवलीच्या सभेत त्यांनी मराठीच्या मुद्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना आणि दोन्ही कॉंग्रेससह राहूल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. आपण घेतलेली मराठीपणाची भूमिका चुकीची नाही तर ती कायद्याच्या दृष्टीनेही कशी बरोबर आहे ते सांगून देशाच्या अन्य राज्यातील नेते आणि पक्ष आपल्या मातृभाषेचा कसा अभिमान बाळगतात हे सोदाहरण स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य माणसांनी मतभेद आणि पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. पण ते कधी होईल का की त्यासाठी मराठी माणसांनाच रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल.


कॉंग्रेस आणि भाजपची मंडळी महाराष्ट्रात एक बोलतात पण कर्नाटक, तामिळनाडू येथे मात्र कशी दुटप्पी भूमिका घेतात हे सांगून त्यांचे पितळ उघडे पाडले. राहुल गांधी यांचा रोमपूत्र असा केलेला उल्लेख, मग राम माधव यांना कोण संरक्षण देणार हे टाकलेले वाक्य, मराठीच्या प्रश्नावर मनसेने निवडून आणलेल्या तेरा आमदारांमुळे आता इतरांना मराठीविषयी फुटलेला कंठ हा कोणाचे नाव न घेता मारलेला टोला, मराठीच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील मनसेसह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज, मराठी भाषेतच बोला आणि व्यवहार करा, असा दिलेला सल्ला आणि अधूनमधून घातलेली भावनिक साद यामुळे राज यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना जिंकून घेतले आहे.


तामिळनाडूचे एक मुख्यमंत्री अण्णा दुराई यांच्या समाधीचे छायाचित्र, त्यावर लिहिलेल्या ओळी, हिंदी भाषेविषयी असलेला दुस्वास, ममता बॅनर्जी यांनी पन्नास टक्के भूमीपुत्रांसाठी जागा राखीव ठेवा अशा केलेली सूचना, कॉंग्रेसमधील मराठी तरुणांनीही विचार करावा, असे केलेले आवाहन सर्वांची दाद घेऊन गेले. ज्येष्ठ कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे स्मरण करुन यंदाच्या वर्षी मराठी भाषा दिन दणक्यात साजरा करा, पूर्वसंध्येला घरे व इमारतींवर रोषणाई करा आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन जोशात साजरा करा, हे त्यांचे आवाहनही सर्वाना भावले.


भाषिक प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती केली किंवा याच भाषेला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा ठेवली तर त्यात काय चुकीचे आहे. उलट हे ज्यांनी आजवर केले नाही म्हणूनच आज मराठीची दुरवस्था झाली आहे. हे वास्तव आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मनसेच्या धसक्याने अन्य राजकीय पक्षही पुन्हा एकदा मराठीच्या प्रश्नावर बोलायला लागले आहेत. मराठी भाषा, मराठी माणूस याची दखल त्यांनाही घ्यावी लागत आहे आणि हेच राजमंत्राचे व राजबाण्याचे यश आहे. त्यामुळे राज यांनी केलेल्या आवाहनानुसार निदान मराठीच्या प्रश्नावर तरी आपल्या येथील सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे.


हाताची पाचही बोटे जेव्हा वेगवेगळी असतात, तेव्हा त्यांच्यात ताकद नसते पण ती जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याचीच वज्रमुठ तयार होते. मराठी भाषेसाठी मराहाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य मराठी माणसांचीही अशीच वज्रमुठ तयार झाली पाहिजे.               

7 comments:

  1. महाराष्ट्राविषयी किंवा मराठीविषयी इतरांना दुस्वास वाटतो हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता? मराठी माणूस उत्तर भारतीयांत सहज़ मिसळतो, आणि त्यांना खरा राग 'मद्रासी' लोकांवर असतो. तर दक्षिणेकडचे लोक भैयांना शिव्या देतात. तरीही व्यास-वाल्मिकी हा या देशाला बांधून ठेवणारा दुवा आहे, हे विद्‌याधर गोखल्यांचं विधान खरं आहे. इतर भारतीयांना निदान सुशिक्षित मराठी लोकांनी शिव्या देऊ नयेत.

    सावरकरांवर मणिशंकर अय्यरांचा राग हा हिंदुत्वाशी निगडित आहे, मराठीशी नाही. विजय तेंडुलकरांचा नरेन्द्र मोदींवरचा रागही हिंदुत्वाशी निगडित आहे, गुज़राथ/थी-शी नाही.

    मुंबईवरून चालू असलेला वाद हा प्रासंगिक कारणांमुळे आहे. त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, पण ते आत्ताच सांगता येणार नाही. काही निर्णय हे तत्त्वत: घ्यायचे नसून परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. तेव्हा मुंबई सर्व भारतीयांची हे तत्त्व मान्य करून तिथल्या मराठी संस्कृतीची ज़पणूक कशी करावी, हा प्रश्न आहे. शिवसेना आपली वाटते, पण ते राजकारण द्‌वेषावर आधारित आहे, हे योग्य नाही. आपण बिहारमधले कायदाप्रेमी नागरिक असतो, तर आपल्यालाही महाराष्ट्राचं आकर्षण वाटलं असतं.

    वीस वर्षांपूर्वी पंजाबमधे सरकारनी फुटीर चळवळ ठेचायला भयानक हिंसाचार केला. ती काळाचीच गरज़ होती. म्हणून आपल्याला पंजाबी लोकांविषयी दुस्वास आहे, असा अर्थ नाही.

    मुंबईत येणारे लोंढे हा व्यावहारिक पातळीवर निश्चित प्रश्न आहे. पण त्याचा कसल्याही तत्त्वाशी किंवा दुस्वासाशी संबंध नाही.

    ReplyDelete
  2. छान झाला आह लेख. IBN लोकमत ने राज यांच्या भाषणाने लोकांची निराशा केली असं वृत्ता दाखवलं कॉंग्रेसीच ते राज चं कसां कौतुक करतील.
    नानी...सारख्य लोकांच्या पुचाट धोरणामुळे मराठीचे हाल कुत्रं सुद्धा खात नाही. त्यांना जाऊन रेडिओ मिर्चीला मराठी गाणी लावायला सांगा म्हणावं. कसलीही भूमिका न घेणे म्हणजे आपण सर्वसमावेषक अशी भाकड कल्पना गांधीनी या देशात रुजवली आहे त्याचे दुष्परिणाम दुसरं काय.

    ReplyDelete
  3. नानीवडेकर
    आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
    मराठी माणूस किंवा महाराष्ट्राविषयी इतरांना म्हणजे राजकीय पक्ष,नेत्यांना दुस्वास वाटतो,हे अनेकवेळा आढळून आले आहे. भाषिक प्रांतरचनेनुसार देशातील अन्य राज्यांची निर्मिती झालेली असताना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणे, महाराष्ट्र व गुजराथ यांचे एकत्र द्विभाषिक राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न होणे, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी ठेवण्याचा डाव आखणे ही सारी दुस्वासाची नाहीतर कशाची लक्षणे होती. आचार्य अत्रे यांचा मराठा व नवयुग यांनी आणि अन्य मंडळींनी केलेल्या प्रखर आंदोलनातूनच मुंबईसह महाराष्ट्र मिळाला आहे हे कसे विसरुन चालेल.
    बॉम्बेचे मुंबई करायलाही केंद्र शासनाशी संघर्ष कारावा लागणे, अबु आझमी यांनी मराठीतून शपथ घेण्यास दिलेला नकार, महाराष्ट्रात मराठी विषय सक्तीचा करण्यावरुन अन्य भाषिक शाळांच्या व्यवस्थापनाकडून होणारा गदारोळ,दुकानांच्या पाट्या मराठीतून करण्याच्या सक्तीवरुन झालेले वाद, रिलायन्स फ्रेशच्या दुकानात विकण्यात येणाऱया वस्तूंच्या पाकिटांवर मराठी सोडून अन्य भाषा असणे, व्होडाफोन किंवा अन्य मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअर सेंटरला मराठातून उत्तर न मिळणे, खासगी एफ.एम. वाहिन्यांवर मराठी गाणी प्रसारित न करणे हे मराठीविषयीचा दुस्वास नाही तर काय आहे. अर्थात या सगळ्याला आपलेच बोटचेपे धोरण असलेले आणि दिल्लीपुढे घालीन लोटांगण घालणारे नेते आणि एकमेकांचे पाय ओढणारी काही मराठी माणसेच कारणीभूत आहेत, हेही विसरुन चालणार नाही. असो.

    साधक
    आपल्याही प्रतिसादाबद्दल आभार.

    ReplyDelete
  4. मुंबई हा नि:संदिग्धपणे महाराष्ट्राचाच भाग आहे, याची मला खात्री नाही. द्‌विभाषिक राज्य मोरारजी देसाई वगैरे मंडळींना हवं होतं याचं कारण मुंबईची आर्थिक सुबत्ता, मराठीवरचा दुस्वास नाही. गांधी-नेहरुंना महाराष्ट्राची इथल्या हिंदुत्ववादी परंपरेमुळे भीती वाटे, म्हणून या बाबत नेहरु-मोरारजी एकाच माळेचे; ब्रिटिशांना देखील ती भीती वाटत असे. पु भा भाव्यांना हिस्लॉप कॉलेजात प्रवेश देताना, 'Are you a Konkanastha Brahmin' असा प्रश्न गोर्‍या मास्तरनी विचारला होता. मराठी परंपरेची ही किंमत द्‌यावी लागते, ही खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे.

    १९३०-४० कडे नागपूरच्या द्‌ऋष्टीनी पुणे-मुंबई भाग वेगळ्या राज्यात असूनही या दोन प्रदेशातल्या विवेकी मराठी भाषिकांत आपुलकी होतीच. नंतर एक राज्य होऊनही दोन भागांतले मूर्ख लोक एकमेकांना विनाकारण शिव्या देतातच. शिवाजीनी सुरत लुटूनही (विवेकी) गुजराथी हिंदुंना त्याबद्‌दल आकस नाही. आणि मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली असती तरी दिल्लीचं पंजाब, यू पी भागाशी नातं टिकून आहे, तसं मराठीचं मुंबईशी नातं राहिलंच असतं. इतक्या क्षुल्लक गोष्टी काय मनाला लावून घ्यायच्या. त्यापेक्षा आसामातली मुसलमानांची घुसखोरी मला जास्त चिंताजनक वाटते. मुंबईतली बांगलादेशी घुसखोरी भयानक आहे. देशभर मदरसांना पेट्रोडॉलर मिळतो. हे प्रकार देशाला घातक आहेत.

    मराठीचं हिंदीशी साम्य आणि समान लिपी यांच्यामुळे अनेक संदर्भात मराठीची वेगळी सोय करण्याची गरज़ व्होडाफोन किंवा रिलायन्स फ़्रेशला वाटत नाही. त्यात काय नवल आहे? अमेरिकेतल्या ४-५ वर्षाच्या मराठी मुलांनाही मराठी भाषा अत्यावश्यक नाही, हे लक्षात येतं आणि ते तसे वागतात. हरयाणा-राजस्थानचीही आपली भाषा आहे. ती कुठे आर्थिक क्षेत्रांत दिसते? याचा अर्थ कुणाला त्या भाषांचा दुस्वास आहे, असं नाही.

    आणि मराठी गाणी म्हणाल तर आज़ची नवी मराठी पिढी चांगलं संगीत ऐकतच नाही. त्यांना जगजित सिंह, ग़ज़ल, आर डी बर्मन वगैरे बकाल प्रकार हवेत. वाहिन्यांवर मराठी गाणी न लावणे हा आर्थिक निर्णय आहे. असली गाणी मराठीत जास्त संख्येनी नाहीत, याचा मला आनन्द आहे. जेव्हा भारतात संगीतविषयक अभिरुची चांगली होती तेव्हा बालगंधर्व, दीनानाथ या लोकांना आंध्र, कर्नाटक या भागातही मागणी होती. आजही माझे शास्त्रीय संगीतात रस असलेले अनेक अमराठी मित्र नाट्यसंगीत, भीमसेनची अभंगवाणी, सुधीर फडके, वसंत प्रभू, हृदयनाथ यांची गाणी आवडीनी ऐकतात. पण वाहिन्या नेहमी पैशाचा विचार करतात. मराठी माणूस इतर भाषांमधली भंकस गाणी जास्त गोडीनी ऐकतो, याला इतर कोणी बाहेरचे अमराठी लोक ज़बाबदार नाहीत.

    ReplyDelete
  5. अगदी राहवत नाही म्हणून शेवटी विचारतोय.. "And Mr. Naniwadekar, Your point is ????"

    ReplyDelete
  6. नानीवडेकर
    भाषिक प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर आणि राज्याची राजभाषा म्हणूम मराठीचा स्वीकार केल्यानंतर मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या हक्कांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असा आग्रह कोणी धरला तर त्यात काही चूक आहे, असे मला तरी वाटत नाही. सर्वसामान्य मराठी माणूस तोच विचार करतो. मुळात महाराष्ट्रात, मुंबईत मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतोय, हेच माझ्या मते हास्यास्पद आहे.
    शेखर जोशी

    ReplyDelete
  7. हेरंभ,
    नेमका प्रश्न विचारला आहेस. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
    शेखर

    ReplyDelete