27 February 2010

आम्ही मराठी बोलू कवतिके

आकाशवाणी आणि दूरचित्रवाहिन्यांवरील निवेदक आणि वृत्तनिवेदकांकडून मराठी भाषेची केली जाणारी तोडमोड आणि केले जाणारे शब्दांचे उच्चार यांचे ‘कवतिक’ न संपणारे आहे. मात्र ज्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, त्यांच्याबद्दल आकाशवाणीच्या निवेदकाचा हा किस्सा भन्नाटच आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने घडलेला हा प्रसंग खूप काही सांगून जाणारा.


निवेदक किंवा वृत्तनिवेदक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा, संस्कृती, साहित्य यांची किमान जुजबी ओळख असलीच पाहिजे अशी अपेक्षा काही चुकीची नाही. आकाशवाणीच्या या निवेदकाचा वि. वा. शिरवाडकर आणि कुसुमाग्रज या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचा समज झाला होता. सुदैवाने कार्यक्रम प्रसारित होण्यापूर्वी ही बाब लक्षात आली आणि आकाशवाणीचे व त्या निवेदकाचेही वस्त्रहरण होता होता टळले. अशा या गमती आकाशवाणी, दूरदर्शन आणि दूरचित्रवाहिन्यांवरील निवेदक व वृत्तनिवेदकांकडून नेहमीच घडत असतात. ही दोन्ही प्रसारमाध्यमे एका वेळी लाखो प्रेक्षक आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे खरे तर येथे काम करणाऱ्या निवेदक-वृत्तनिवेदक मंडळींनी नेहमीच योग्य पद्धतीने आणि थोडीशीही चुक होणार नाही, ही काळजी घेऊन बोलले पाहिजे.

खासगी एफ एम रेडिओ आणि दूरचित्रवाहिन्या व वृत्तवाहिन्यांवरुन तर अधूनमधून मराठीची अशीच वाट लावली जात असते. मराठी भाषेत समर्पक शब्द असतानाही बोलताना हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचा वापर करणे, कार्यक्रम आणि मालिकांना ना धड मराठी ना धड इंग्रजी अशी नावे देणे तर सर्रास चालते. वृत्तवाहिन्यांवर हातात ‘दंडुका’घेऊन जे वार्ताहर (ज्यांना त्या प्रसारमाध्यमाच्या भाषेत ‘पीटुसी’ म्हणून ओळखले जाते) बातमी सांगत असतात, त्यापैकी अनेकजण मराठी असले तरी बोलताना सर्रास इंग्रजी शब्द वापरत असतात. इव्हेंट, पोलीस कस्टडी, मेगा फायनल, फोन कट झाला आहे, आपली रिअ‍ॅक्शन काय, खूप क्राऊड जमा झाला आहे, रेस्क्यू ऑपरेशन, टेररिस्ट, फायर ब्रिगेड, सस्पेंण्ड, ट्रान्सफर, लोडशेडींग आणि अशा अनेक शब्दांचा त्यात समावेश असतो. एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, मोठा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर सर्रास पुस्तकाचे ‘विमोचन’ यांच्या हस्ते करण्यात आले, हा कार्यक्रम ‘संपन्न’ झाला अशी वाक्यरचना केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीच्या विकासासासाठी खास मराठी राजव्यवहार कोश तयार करवून घेतला होता. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषेत घुसलेल्या इंग्रजी, हिंदी, अरबी, फारसी अशा शब्दांना अत्यंत समर्पक असे पर्यायी मराठी शब्द दिले आहेत. ते आज प्रचलितही आहेत. महापालिका, महापौर, महापालिका आयुक्त, नगरसेवक आणि या सारखे आणखी कितीतरी शब्द ही सावरकर यांनी मराठी भाषेला दिलेली देणगी आहे. पण असे समर्पक मराठी शब्द वापरणे हे निवेदक आणि वृत्तनिवेदकांना मागासलेपणाचे लक्षण वाटत असावे. त्यामुळे मग सर्रास कोणतेही शब्द वापरले जातात.

काही जणांचे म्हणणे असे की दुबरेध शासकीय मराठी शब्दांऐवजी किंवा संस्कृत शब्दांना पर्याय म्हणून इंग्रजी शब्द वापरले तर काय बिघडते. त्यातून मराठी भाषा बुडणार आहे का, येथे काही बिघडण्याचा प्रश्न नाही. पण इंग्रजी किंवा अन्य भाषेतील शब्दांना समर्पक व पर्यायी मराठी शब्द असताना ते न वापरता परकीय शब्दांचा आधार घेण्यात काय भूषण आहे, आपल्या भाषेचा आभिमान आणि अस्मिता आपणच जपायची असते. प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या मंडळींनी तर त्याची गंभीरतेने काळजी घेतली पाहिजे. कारण आत्ताच्या पिढीतील काही अपवाद वगळता अनेकजण वृत्तपत्र किंवा पुस्तके वाचण्याऐवजीएफएम रेडिओ ऐकणे किंवा दूरचित्रवाहिन्या पाहणे अधिक पसंत करत आहेत. आकाशवाणी आणि दूरचित्रवाहिन्यांवरुन अनेकदा निधनाच्या बातमीत हमखास चुकीची वाक्यरचना केली जाते. बरेचदा ‘या व्यक्तीच्या पार्थिव शरीरावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले’ किंवा ‘ अमूक अमूक यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आता पार्थिव म्हणजेच मृत व्यक्ती. मग ‘पार्थिव शरीर’ असा शब्दप्रयोगही चुकीचा झाला. त्याऐवजी ‘अमूक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले किंवा अमूक यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते’, असे वाक्य असायला पाहिजे. काही वेळेस अंत्यसंस्काराची बातमी सांगताना ‘यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे काल निधन झाले होते’ असे सांगण्यात येते. ‘निधन झाले होते’ म्हणजे आता त्या व्यक्तीबाबत काही वेगळी गोष्ट घडली आहे किंवा घडणार आहे का, त्यामुळे येथे खरे तर ‘काल त्यांचे निधन झाले’ असे वाक्य असायला पाहिजे.

आकाशवाणीवरून हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज सांगण्यात येतो. येथेही काही वेळेस ‘आत्ताच आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकलं’ असे चुकीचे बोलले जाते. वाक्याच्या शेवटी हवामानाचा अंदाज हा शब्द वापला असेल तर ‘ऐकलात’ असेच म्हणायला पहिजे. जर वाक्याच्या शेवटी हवामान वृत्त असा शब्द वापरला तर त्या ठिकाणी ‘ऐकलं’ हा शब्द वापरणे योग्य ठरेल.

ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती ही दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरी केली जाते. हा दिवस केवळ उपचार म्हणून साजरा न करता आपण सगळ्यानीच त्या निमित्ताने काही संकल्प करुन तो मनापासून अंमलात आणण्याची गरज आहे. नाहीतर मराठी भाषा दिन आणि १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आपण फक्त साजरे करत राहू पण मराठी भाषा आणि संस्कृतीचे भवितव्य मात्र कठीण असेल. वि. वा. शिरवाडकर यांनीच काही वर्षांपूर्वी ‘भरजरी वस्त्रे ल्यालेली मराठी भाषा मंत्रालयाच्या बाहेर दिनवाणी उभी आहे’ असे सांगितले होते. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत आणि येणाऱ्या भविष्यकाळात वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे हे वाक्य खरे करून दाखवायचे की खोटे ठरवायचे हे आपल्याच सर्वाच्या हातात आहे.
 
माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२७ फेब्रुवारी २०१०) मध्ये पान-१ वर प्रसिद्ध झाला आहे. 

3 comments:

  1. सहमत आहे. काल निधन झाले होते... म्हणजे आज काय..,असा प्रश्न केवळ ही बोली मराठी अंगवळणी पडल्याने आपल्या मनात येत नाही परंतु खरेच ही रचना चुकिचीच आहे.
    जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. > आता पार्थिव म्हणजेच मृत व्यक्ती. मग ‘पार्थिव शरीर’ असा शब्दप्रयोगही चुकीचा झाला. त्याऐवजी ‘अमूक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले किंवा अमूक यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते’, असे वाक्य असायला पाहिजे.
    >---

    पार्थिव म्हणजे मृत व्यक्ती की अचेतन देह? कारण 'अमूक यांचे (पार्थिव, म्हणजे) मृत व्यक्ती अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते' हे ठीक नाही. 'अमुक यांचे काल निधन झाले होते, (म्हणून) आज़ अंत्यसंस्कार पार पडले' हे मला खटकत नाही. 'काल पाऊस पडला (होता), म्हणून आज़ रस्ते घसरडे' ही त्यामागे भूमिका आहे. पण फक्त 'अमुक यांचे काल निधन झाले होते' हा प्रयोग खटकतो.

    सावरकरांनी 'नगरसेवक' सारखे छान शब्द सुचवले, तसेच 'दिग्दर्शक' सारखे कोणालाही बोध होणार नाही असे इंग्रजीपासून आंधळे भाषान्तर केलेले क्लिष्ट शब्दही सुचवले. ज़े शब्द सावरकरी कवितेचे किंवा गद्‌याचे वैभव ठरतील, ते इतर संदर्भात शोभतीलच असं नाही. मुळात ज्या गोष्टीचा एक छोटा घटक (smallest unit) म्हणून विचार व्हावा, त्यांना छायाचित्र, स्तनाग्र वगैरे शब्द नकोत. याला फोटो, निप्पल हे कसे सुरेख शब्द इंग्रजीत आहेत. शब्द उच्चारताच वस्तू डोळ्यांपुढे उभी राहते. जिथे सचित्रता हवी तिथे अर्थवाहकता वगैरेच्या भानगडीत पडू नये. ('सचित्र' हा देखील निष्कारण कठीण असा शब्द.) इंग्रजीत बोज़ड शब्द नाहीत, असा भाग नाही. पण त्या भाषेला सध्या चलती आहे, तेव्हा आपण पहिले मराठीची काळजी केलेली बरी. सोपे, पर्यायी असे नवीन शब्द मराठीत तयार करण्याची मोठी गरज़ आहे.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  3. आमचे एक सन्मित्र म्हणतात की 'स्तनाग्र' शब्द चित्रदर्शी आहे. तसा हा मुद्‌दा मान्य आहे, पण तो ज़ोडशब्द आहे आणि 'अग्र' हा वापरात नसलेला शब्द आहे, म्हणून अनेक लोकांना त्याचा अर्थही एकदम कळणार नाही, आणि तो गूढ, वैद्‌यानिक शब्द वाटेल. 'दिनांक' हा पण चपखल, सुन्दर शब्द. पण दिन आणि अंक हे शब्दही कमी वापरातले, तेव्हा date शब्द त्यापेक्षा सुटसुटीत आहे.

    मराठीतल्या बोज़ड शब्दांवर 'एक शून्य मी' पुस्तकात पु लं चा वाचनीय लेख आहे.

    ReplyDelete