08 June 2010

पाऊस तरणा आणि म्हातारा

मुंबई वगळता राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी मुंबईत मात्र त्याने अशी जोरदार हजेरी लावलेली नाही. असा हा पाऊस कधी जोरदार तर कधी रिमझिम असतो. पाऊस ज्या नक्षत्रात पडतो, त्या प्रत्येक नक्षत्रातील पावसाला वेगवेगळी नावे असून ती गमतीशीर आहेत. प्रत्येक नक्षत्रात पडणारा हा पाऊस ‘तरणा’, ‘म्हातारा’, ‘सासूचा’ आणि ‘सूनेचा’अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. ही नावे आपल्याकडे पूर्वापार चालत आली असून शेतकरी आणि लोकांनी ती अनुभवातून दिली आहेत.


पंचांगात पावसाची एकूण बारा नक्षत्रे दिली असून रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रात पाऊस पडला तर खूप पडतो किंवा  फारसा पडतही नाही. म्हणून त्या काळातील पावसाला कोणतेही नाव दिलेले नाही. ‘पुनर्वसु’ या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा’ तर पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा’ असे नाव दिले आहे. आश्लेषा नक्षत्रातील पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ असे म्हणतात. मघा व पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला अनुक्रमे ‘सासूचा’ व ‘सूनेचा’ पाऊस असे नाव आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘रब्बीचा’ तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्तीचा’ पाऊस या नावाने ओळखले जाते.

याविषयी अधिक माहिती देताना पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, पावसाला ही नावे लोकांनी दिलेली असून ती गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहेत. त्या प्रत्येक नावावरून त्या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. यंदाच्या वर्षी ६ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करत आहे. हा काळ सगळ्यात जास्त पाऊस पडणारा असतो. या दिवसात पडणारा पाऊस हा जोरदार, मुसळधार आणि जोशपूर्ण असतो. म्हणून या पावसाला तरणा पाऊस असे नाव दिले आहे. पुष्य नक्षत्रात पडणारा पाऊस हा सातत्य असलेला पण रिमझिम पडतो. शेतीसाठी तो उपयोगी असतो. त्यात जोश नसल्याने त्याला म्हातारा असे नाव दिले गेले आहे.

पुन्हा मघा नक्षत्रात पडणारा पाऊसही (यंदाच्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी सूर्य उत्तररात्री ५ वाजून ३४ मिनिटांनी या नक्षत्रात प्रवेश करत आहे) जोरदार, कडाडणारा आणि त्रास देणारा असतो. म्हणून त्याला सासूचा पाऊस असे म्हणतात तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस शातंपणे येतो. तो शेतीला उपयोगी असतो. त्यामळे त्याला सूनांचा पाऊस असे नाव दिले आहे.

उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस हा त्या वेळी होणाऱ्या रब्बी पिकांसाठी उपयुक्त असल्याने त्याला रब्बीचा तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला हत्तीचा पाऊस असे नाव दिले आहे. हस्तातील पाऊसही शेतीसाठी उपयुक्त असतो. त्यामुळेच आपल्याकडे ‘पडतील हस्त तर शेती होईल मस्त’ असे म्हटले जाते.

यंदाच्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्रात पडणारा पाऊस हा शेतीचे नुकसान करणारा असल्याने ‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ असे म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे. तर स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तर ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ असे आपल्याकडे म्हटले जाते.

नक्षत्राप्रमाणेच पावसाचे वाहन आपल्याकडे सांगितलेले आहे. विविध प्राणी पावसाचे वाहन म्हणून सांगितले असून त्या प्राण्यांचे गुणधर्म, सवयी यानुसार तेव्हा पाऊस पडतो, असे मानण्यात येते. हत्ती, म्हैस, बेडूक ही वाहने असतील तर तेव्हा जास्त पाऊस पडतो. कारण हे सर्व प्राणी पाण्याशी संबंधित आहेत. तर उंदीर, घोडा या वाहनावर कमी प्रमाणात पाऊस येतो. गाढव वाहन असेल तर पाऊस पडला तर भरपूर नाहीतर अजिबात पडत नाही, असेही सोमण म्हणाले.

पावसाच्या या वाहनांना किंवा त्या त्या नक्षत्रात जो पाऊस पडतो त्याला कोणतीही शास्त्रीय किंवा वैज्ञानिक बैठक नाही. शेतकरी आणि लोकांनी वर्षांनुवर्षांच्या अनुभवातून आणि परंपरेनुसार पावसाची ही नावे दिलेली असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

1 comment:

  1. मस्त नक्षत्राच्या पावसाच्या पाण्याने दह्याला विरजण लागते. स्वाती नक्षत्रातील पावसाचा थेंब शिंपल्यात पडला तर त्यापासून मोती तयार होतो. उत्तराच्या पावसात किटक नाशक व आरोग्यदायक गुणधर्म असतात. याप्रमाणे इतर नक्षत्रातहि काय गुणधर्म असतात याचा कृपया शोध घ्यावा.

    ReplyDelete