26 November 2009

मुंबईचा पाणीपुरवठाही अतिरेक्यांचे लक्ष्य ठरू शकतो..


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत पालिका प्रशासनाने दावा केला असला तरीही दहशतवादी किंवा राष्ट्रद्रोही शक्तींकडून कधीही, केव्हाही आणि कसाही घातपात घडवून आणला जाऊ शकतो, अशी वस्तुस्थिती असल्याचे दिसून येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना असणारा बेकायदा झोपडपट्टय़ांचा विळखा घातलेला भस्मासूर याला कारणीभूत ठरू शकतो. तसेच जलवाहिन्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते नसणे, अपुरी टेहळणी पथके, सुरक्षा विभागातील रिक्त असलेल्या -जागा, झोपडय़ाबरोबरच अन्य अनधिकृत बांधकामांचा विळखा ही कारणेही असू शकतात.

मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर हे तलाव मुंबईबाहेर आहेत. त्या तलावांपासून जलवाहिन्यांद्वारे हे पाणी मुंबईत आणले जाते. पवई, भांडुप कॉम्प्लेक्स, भांडुपखिंडी पाडा आदी मार्गे ते मुंबईकरांना मिळते. ठाण्यातील काल्हेर चौक हे भिवंडी रस्त्यावर असून त्या समोरुन म्हणजे बाळकूम व कशेळी गावातून सुमारे १२० इंच व्यासाची मोठी जलवाहिनी जाते. काल्हेर चौकी ते कल्याण पूल व कल्याण पूल ते शांतीनगर येथे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. भिवंडी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीतील नागरिक कल्याण पूल ते पोगाव जंक्शन या परिसरात आंघोळ आणि प्रश्नत:विधीसाठी याच जलवाहिनीच्या पाण्याचा वापर करतात. त्यांना अटकाव करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत.

जलवाहिन्यांना पडलेल्या बेकायदा झोपडपट्टय़ांची संख्या सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते. मुलुंड ते धारावी आणि शीव परिसरात हा विळखा जास्त प्रमाणात आहे. वांद्रे रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरुन पूर्वेकडे जाताना जलवाहिन्यांना वेढलेल्या या झोपडय़ा अगदी सहज दृष्टीस पडतात. काही ठिकाणी तर बैठय़ा झोपडय़ांवर चक्क एक ते दोन मजलेही उभारण्यात आले आहेत. हा सगळा भाग बेहरामपाडा म्हणून ओळखला जातो. जलवाहिन्यांना असलेल्या या बेकायदा झोपडय़ांमुळे पाणीचोरी, पाणीगळती मोठय़ा प्रमाणात होत आहेच, पण त्यामुळे पालिकेच्या जलंभियंता खात्याच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन जलावाहिन्यांची देखभाल करणेही कठीण जात आहे.

पालिका प्रशासनानेच तयार केलल्या अहवालानुसार मुलुंड ते भांडुप संकुल, भांडुंप संकुल ते दिनशा ब्रिज, मरोशी ते अंधेरी-कुर्ला मार्ग, कुर्ला अंधेरी मार्ग ते सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ, साकीविहार भाग, घाटकोपर ते साकीनाका क्रॉस कनेक्शन, सहार एबी ते वांद्रे आणि माहीम परिसरात या झोपडय़ा आहेत.

या प्रश्नाकडे राजकीय किंवा जातीय भूमिकेतून न पाहता लाखो मुंबईकरांसाठी असलेला धोका म्हणून त्याकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती आणि धाडस दाखवत तेथे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करत या झोपडय़ा जमिनदोस्त केल्या पाहिजेत. तसेच येथून पुढे जलवाहिन्यांच्या परिसरात किंवा जलवाहिन्यांवर एकही झोपडपट्टी होणार नाही, त्याची खबरदारी घेतली पाहिजे.

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त, २६ नोव्हेंबर २००९ पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झालेली माझी बातमी)

1 comment:

  1. जगातल्या कुठल्याही ठिकाणी पाणीपुरवठा हा दहशतवाद्यांचं हत्यार ठरू शकतो. अणुबॉम्ब ज्या कारणासाठी टाकल्या जाण्याची शक्यता कमी असते, तोच नियम इथे लागू होतो. जर एका देशानी इतरांवर तो प्रयोग केला तर त्या देशाला लगेच तशाच प्रतिहल्ल्यापासून सुरक्षा नाही.

    पाणीपुरवठ्याद्‌वारे किती आणि कशी दहशत पसरवता येईल हे सांगणं कठीण, पण कोणत्याही मोठ्या गावाचं पाणी तुम्ही किंवा इतरही कोणी माणसानी सांगितलेले उपाय वापरून सुरक्षित करता येणार नाही. कधीच नाही.

    सगळ्या गोष्टी १००% सुरक्षित हव्या ही केविलवाणी धडपड आहे. अमेरिकेत असल्या व्यर्थ चर्चा भरपूर होतात, प्रयत्न केल्याचं नाटक केल्या जातं, जनतेला आश्वासनं दिल्या जातात. उद्या पत्नी घटस्फोट देते आहे म्हणून वैतागून एखाद्या वैमानिकानी उंच इमारतीत विमान घातलं तर काय? एक असा प्रयोग फ्लॉरिडात २००२ सुमारास झालाही आहे. त्या हौशी वैमानिक पोराला म्हणे पहायचं होतं की विमान इमारतीवर नेल्यास नक्की काय होणार. तपशील आता आठवत नाही.

    आजमितीला अनेक धोके असे आहेत की ज्यावर अत्यंत मर्यादित प्रमाणातच उपाय केले जाऊ शकतात. कितीही झोपड्या उडवल्या तरी हा धोका नष्ट व्हायचा नाही. आणि किती झोपड्या उडवता येतील यालाही मर्यादा आहेत. झोपड्या हटवण्याचा निषेध म्हणून घातपात केला तर? प्रत्येक प्रश्नावर किंवा धोक्यावर शोधल्यास इलाज असलाच पाहिजे, हा तुमचा समजच अमेरिकन-स्टाइल आणि चुकीचा आहे.

    ReplyDelete