19 January 2010

लावणीचा ठसका

झी टॉकिजच्या नटरंग या मराठी चित्रपटातील लावण्यांमुळे पुन्हा एकदा लावणीचा ठसका अनुभवायला मिळाला आहे. त्याबद्दल संगीतकार अजय-अतुल आणि गीतकार गुरु ठाकुर हे खरोखरच अभिनंदानास पात्र आहेत. आज शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, अप्सरा आली ही गाणी लोकप्रिय झाली आहेत. अनेकांच्या मोबाईलवर ही गाणी हमखास ऐकायला मिळतातच.


मराठी चित्रपट म्हणजे तमाशा आणि लावणी हे एकेकाळी समीकरण झालेले होते. किमान एखादी तरी लावणी मराठी चित्रपटात असायचीच. तर अनेक चित्रपट हे केवळ तमाशाप्रधान होते.  व्ही. शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटातील सर्वच गाणी अर्थात लावण्या गाजल्या. आज इतक्या वर्षांनंतरही त्या गाण्यांची गोडी कमी झालेली नाही. ढोलकीची कडकडीत थाप ऐकली की आपले पायही बसल्या जागी ताल धरून नाचायला लागतात. मरगळलेल्या मनाला एक नवा उत्साह आणि उभारी मिळते. अंगात जोश संचारतो. तुम्हाला असा अनुभव आला आहे की नाही. रेडिओ, दूरचित्रवाहिन्या किंवा मोबाईलवरती लावणीतील ढोलकीची थाप आणि तो  ठेका ऐकून आपणही नाचावे असे वाटते. कोणत्याही मराठी वाद्यवृंदात एखादी तरी लावणी असतेच असते. त्याच्याशिवाय तो कायर्क्रम होऊच शकत नाही. शाळा आणि महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनातही लावणीवर नाच असतातच.


नटरंगच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा लावणी या गीत व नृत्य प्रकाराचे नव्या पिढीकडूनही स्वागत झाले आहे. गेल्या काही वर्षात नव्याने प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील लावण्या या खूप गाजल्या. नवरा माझा नवसाचा मधील चला जेजुरीला जाऊ किंवा दे धक्का मधील उगवली शुक्राची चांदणी आणि अन्य काही लावण्या ही याची ठळक उदाहरणे म्हणता येतील. मराठी संगीत आणि संस्कृतीत लावणी या लोकप्रकाराला विशेष महत्व आहे. लावणीमध्ये फडाची लावणी, बैठकीची लावणी,
बालघाटी, छक्कड, सवाल -जबाब, कलगीतुरा असे काही प्रकार आहेत. यातील सवालजबाब, बैठकीची लावणी, फडाची लावणी आपण बरेचदा मराठी चित्रपटातून पाहिलेल्या आहेत. लता मंगेशकर यांनी म्हटलेली राजसा जवळी जरा बसा हा बैठकीची लावणी आहे. काही दिवसांपूर्वी मला वाटते दूरदर्शच्या सह्याद्री वाहिनीवर असेल, संगीततज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांचा एक कार्यक्रम पाहिल्याचे आठवते. त्यात त्यांनी लावणीचा इतिहास, लावणीचे विविध प्रकार हे सगळे सविस्तर सांगितले होते.


मराठी चित्रपटातून लावणी हा प्रकार अमाप लोकप्रिय झाला त्याचे सर्व श्रेय गीतकार, गायक आणि संगीतकार यांनाच आहे. सुलोचना चव्हाण, उषा मंगेशकर, आशा भोसले, लता मंगेशकर, उत्तरा केळकर, पुष्पा पागधरे आदींच्या अनेक लावण्या प्रसिद्ध आहेत. राम कदम, वसंत पवार, वसंत प्रभू हृदयनाथ मंगेशकर ते आत्ताच्या अजय-अतुल पर्यंत संगीतकारांचाही लावणी लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे. शाहीर होनाजी बाळा, राम जोशी, पठ्ठे बापुराव आणि त्या पिढीतील मंडळींनी लावणीचा पाया घातला.  त्यानंतर ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर आणि अन्य गीतकारांनी त्यावर कळस चढवला. तमाशाचे विविध फड, वग आणि त्यात काम करणाऱया कलाकारांनी लावणी जीवंत ठेवली आहे. अनेकांनी तर आपले सारे आयुष्य यात खर्ची घातले आहे.  नटरंगच्या निमित्ताने गुरु ठाकुर यांनी पुन्हा एकदा लावणी लोकप्रिय  केली आहे. मराठी माणूस आणि संस्कृती जोपर्यंत आहे, तोपर्यंत लावणी हा प्रकार आणि  लावणीचा पर्यायाने मराठी लोकसंगीताचा ठसका असाच अजरामर राहिल यात शंका नाही. 


  


 

1 comment:

  1. एकदा तरी प्रत्यक्ष तमाशा बघयचि इच्छा आहे ;)
    सोनालि आणि अतुल दोघेहि एकदम झकास !!!

    ReplyDelete