31 January 2010

सर्वभाषा कवी संमेलन

साहित्य प्रकारात कविता या प्रकाराला विशेष महत्व आहे. कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकाराबरोबरच कविता हा प्रकारही लोकप्रिय आहे. कवितेलाच संगीत दिल्याने अनेक चांगल्या कवितांची सुमधुर आणि अजरामर अशी गाणी तयार झाली आहेत. मराठीत तर ही काव्यपरंपरा खूप मोठी आहे. कथा किंवा कादंबऱ्यांच्या तुलनेत मराठी काव्यसंग्रहाला फारसा खप नसला तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अन्य कोणत्याही साहित्यविषयक कार्यक्रमात नवोदित आणि मान्यवरांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम हा असतोच आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.सध्याच्या दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणात आकाशवाणी थोडीशी मागे पडली असली तरी अन्य प्रसारमाध्यमांच्या तुलनेत आकाशवाणीवर कविता या प्रकाराला चांगले स्थान दिले जाते. गेली तीस वर्षे आकाशवाणीकडून आयोजित करण्यात येणारे ‘राष्ट्रीय सर्वभाषा कवी संमेलन’ हे त्याचेच ठळक उदाहरण आहे. आकाशवाणीची विभागीय केंद्रे आणि राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी होणारा हा कार्यक्रम म्हणजे कवितेच्या माध्यमातून देशातील अनेक भाषांना एकत्र आणण्याचे आणि त्या त्या भाषेतील चांगल्या कविता संपूर्ण देशभरात पोहोचविण्याचा एक स्तुत्य उपक्रम आहे.


यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या गुवाहाटी केंद्राकडून नुकताच श्रोत्यांपुढे गुवाहाटी येथे सादर झाला. यात निवडण्यात आलेल्या कवितांचे सादरीकरण देशभरातील विभागीय आकाशवाणी केंद्रांकडून आपापल्या केंद्र स्तरावर करण्यात येते. मुंबई केंद्राकडून सादर झालेल्या कार्यक्रमाची निर्मिती येथील कार्यक्रम अधिकारी महेश केळुस्कर यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संचालिका भारती गोखले-रुस्तुम (या आज सेवानिवृत्त होत आहेत) यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. मंगेश पाडगावकर, प्रा. शंकर वैद्य, अशोक नायगावकर, अनुपमा उजगरे आणि अन्य कवींनी विविध भाषातील या कवितांचे सादरीकरण केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन आकाशवाणीचे निवेदक किशोर सोमण यांनी केले होते.


सर्वभाषा कवी संमेलनात देशभरातील २३ विविध भारतीय भाषांमधून कविता सादर केल्या जातात. यात संस्कृत, मराठी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराथी, कन्नड, कोकणी, काश्मीरी, मणीपुरी, मल्याळम, मैथीली, नेपाळी, पंजाबी, सिंधी, तेलुगू, उडिया, ऊर्दू आणि हिंदी या भाषांचा समावेश आहे. आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांतर्फे कवितांची निवड करुन त्याची शिफारस विभागीय केंद्रांकडे केली जाते. विभागीय केंद्रांकडून त्यातील निवडक कवितांची निवड करून मूळ कविता, त्या कवीचा परिचय आणि हिंदी व इंग्रजी भाषेतील त्या कवितेचा सारांश हा दिल्ली केंद्राकडे पाठवला जातो. दिल्लीत आकाशवाणी मंत्रालयाच्या महासंचालनालयाकडून त्या त्या भाषेतील तज्ज्ञ मंडळींकडून अंतिम सादरीकरणासाठीच्या कवितांची निवड केली जाते.


त्यानंतर देशभरातील एखाद्या आकाशवाणी केंद्राकडून निवडण्यात आलेल्या कवितांचे सादरीकरण श्रोत्यांपुढे सादर केले जाते. त्या कार्यक्रमात मूळ कवी, अनुवादक सहभागी होतात. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम गुवाहाटी केंद्राने आयोजित केला होता. महाराष्ट्रातून नाशिकचे राम पाठक यांच्या कवितेची निवड यात झाली होती. या कार्यक्रमानंतर सादर झालेल्या सर्व कविता गुवाहाटी, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, बंगलोर, श्रीनगर, थिरुवनंतपुरम, मुंबई, कटक, जालंधर, चेन्नई, हैद्राबाद, पणजी, जम्मू, पाटणा आदी विभागीय आकाशवाणी केंद्रांकडे मूळ कवितेच्या हिंदूी व इंग्रजी अनुवादासह पाठवल्या जातात. आकाशवाणीच्या त्या त्या केंद्राकडून विविध नामवंतांना आमंत्रित करून त्या आकाशवाणी केंद्राच्या अखत्यारीतील स्थानिक भाषेत अनुवादित करून श्रोत्यांना ऐकविण्यात येतात. म्हणजे मुंबई आकाशवाणी केंद्रावरुन त्या सादर करताना सर्व कवितांचा मराठी भाषेतील अनुवाद सादर केला जातो. हा कार्यक्रम राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रे सहक्षेपित करत असतात. सोबत मूळ भाषेतील कवितेचा काही भागही श्रोत्यांना ऐकविण्यात येतो.

 
राष्ट्रीय सर्वभाषा कवी संमेलनासाठी कवितांची निवड करताना देशाची संस्कृती, समाजजीवन, वर्तमानाचे भान या बरोबरच कवितेतून व्यक्त होणारा सामाजिक आशय पाहिला जातो. या निकषांवर कवितांची निवड केली जाते. या कवी संमेलनाच्या निमित्ताने भारतातील विविध प्रादेशिक भाषांमधील कविता आणि कवी संपूर्ण देशभरात पोहोचतात. विविध भाषेतील या कवितांमधून आपल्या समोर भारत उलगडला जातो. विविध प्रादेशिक भाषांमधील कवी आणि कविता अन्य भाषिक राज्यातील श्रोत्यांपर्यंत पोहोचतात, असे आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम अधिकारी महेश केळुस्कर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment