18 January 2010

फोटो ब्लॉग

छायाचित्रण अर्थातच फोटोग्राफी ही एक कला असून त्याचा उपयोग म्हटले तर स्वत:च्या आनंदासाठी म्हणजेच छंद म्हणून आणि म्हटले तर पोटापाण्याचा व्यवसाय म्हणूनही करता येतो. वृत्तपत्रात तर छायाचित्राला अत्यंत महत्त्व आहे. वृत्तपत्राच्या प्रत्येक पानावर छायाचित्र असणे हे त्या पानाची सजावट आणि मांडणीच्या दृष्टीने तसेच वाचकांच्याही दृष्टीने आवश्यक असते.


असे म्हटले जाते की एखादी बातमी किंवा अग्रलेख जे परिणामकारतेने सांगू शकणार नाही ते एखादे छायाचित्र सहज सांगू शकते. त्यामुळेच वृत्तपत्रात छायाचित्र आणि छायाचित्रकाराला आजही महत्त्व आहे. सध्याचा जमाना हा संगणक, इंटरनेट क्रांतीचा असून त्यामुळे आपल्याला घरबसल्या हवे ते पाहणे, ऐकणे आणि कोणत्याही विषयावरील माहिती मिळवणे सहज शक्य झाले आहे. गुगल, याहू आणि अन्य संकेतस्थळांनी आपल्याला मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याच्या माध्यमातून आपण मेल आणि अन्य अनेक गोष्टी सहज साठवून ठेवत असतो. गेल्या काही वर्षांत यात आता विविध ब्लॉग्ज्ची भर पडली आहे. आपल्या मनातील विचार, भावना सहजपणे व्यक्त करण्याचे माध्यम या ब्लॉग्ज्ज्च्या स्वरूपात आज उपलब्ध झाले आहे. मराठी भाषेतही आज दीड हजारांहून अधिक लोक विविध विषयांवर ब्लॉगलेखन करीत आहेत. या ब्लॉगलेखनाप्रमाणेच आता फोटोब्लॉग ही संकल्पनाही हळूहळू वाढीस लागली आहे.


सध्या मोबाईल, डिजिटल कॅमेरे यामुळे कधी नव्हे ते फोटो काढणे सोपे झाले आहे. त्याच्या किंमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असल्याने पूर्वीचे रोल भरण्याचे कॅमेरे मागे पडून त्यांची जागा डिजिटल कॅमेऱ्यांनी घेतली आहे. कितीही फोटो काढा, एखादा फोटो चांगला आला नसेल तर लगेच डिलीट करा, काढलेला फोटो लगेच पाहा, आदींमुळे हे माध्यम खूप जवळचे आणि सोपे झाले आहे. आपल्या मनातील भावना किंवा विचार व्यक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे ब्लॉग आहेत, तसेच आपण काढलेले फोटो कोणीही पाहू शकेल, त्यावर आपली प्रतिक्रिया देऊ शकेल, असे फोटोब्लॉग आज कोणालाही तयार करता येऊ शकतात.



आपण गुगल व अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे ई-मेल खाते किंवा ब्लॉग सुरू करतो त्याचप्रमाणे एखाद्याला फोटोब्लॉगही सुरू करणे सहज शक्य आणि सोपे झाले आहे. या ठिकाणी आपण आपला फोटोब्लॉग सुरू केल्यानंतर त्यावर आपल्याला फोटो अपलोड करता येऊ शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आपण अपलोड केलेली छायाचित्रे जगभरात कोणीही पाहू शकतो.

त्यावर आपली प्रतिक्रियाही देऊ शकतो. विविध विषयांचे वर्गीकरण येथे केलेले असते. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, त्या विषयातील फोटो आपण येथे पाठवू शकतो. गुगल, याहू, ऑर्कूट, फेसबुक, ट्वीटर आदी संकेतस्थळांवरही आपल्याला फोटो अपलोड करता येऊ शकतात. पण काही संकेतस्थळे अशी आहेत की, त्यावर फोटोब्लॉग आपल्याला सुरू करता येऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने लोकप्रिय असलेल्या संकेतस्थळांमध्ये http://www.aminus3.com/, http://www.myphotoalbum.com/ तसेच http://www.photoblogs.org/,
http://www.photographyblogs.com/,  blog.flickr.net, http://www.photoblogdirectory.net/
यांचा समावेश आहे. ब्लॉगला भेट देणाऱ्या लोकांना दररोज एक नवीन छायाचित्र पाहायला मिळते. आपण काढलेली छायाचित्रे ही आपल्यापुरतीच मर्यादित न राहता ती अशा संकेतस्थळांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात .


आज विविध संकेतस्थळावर असे फोटो ब्लॉग असले तरी त्यावर मराठी मंडळी तुलनेत कमी दिसतात. छायाचित्रांच्या बाबतीत ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. फोटोब्लॉगच्या माध्यमातून हौशी, व्यावसायिक असे कोणीही आपल्या छायाचित्रांचा ब्लॉग सुरू करू शकतो. त्याला वयाचेही बंधन नाही. आपली कला आणि छायाचित्रण कलेतील कौशल्य हे आपल्या स्वत:पुरते किंवा कुटुंबीय मित्र आणि परिचितांपुरतेच मर्यादित न राहता अशा फोटोब्लॉग्ज्च्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तेव्हा आता फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांनी त्याचा जरूर फायदा करून घ्यावा.


याच विषयावरील माझा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (१६ जानेवारी २०१०) नध्ये पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40643:2010-01-16-15-47-42&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
 

2 comments:

  1. अभिजीत
    नमस्कार
    आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete