02 January 2010

अप्रतिम शिल्पकलेची लेणी


 अजिंठा लेणी येथे दगडात कोरलेली कमान

काही दिवसांपूर्वी सहकुटुंब औरंगाबादला गेलो होतो. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली अजिंठा आणि एलोरा (वेरुळ) लेणी पाहिली. दोन्ही लेणी पाहिली. ही लेणी पाहाताना आपण जगातील एक प्राचिन असा शिल्पकलेचा वारसा पाहात आहोत आणि तो भारतीय आहे, याचा रास्त अभिमान वाटला. ही लेणी म्हणजे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी याचे एकमात्र उदाहरण आहे. संपूर्ण लेणी म्हणजे अप्रतिम कलाकौशल्याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. खरे तर या दोन्ही लेण्यांचा समावेश जगातील सात आश्चर्यात केला गेला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोन्ही लेणी आणि केलेले कोरीव काम पाहिल्यानंतर न भविष्यती असेच म्हणावे लागते.
औरंगाबाद शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी असून बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तिचित्रे आणि शिल्पकलेचा अजोड आणि अद्वितीय असा हा सर्व परिसर आहे. लेण्यांमधील भिंतींवर गौतम बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग  चितारण्यात आले आहेत. आडव्या पसरलेल्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली असून येथे २९ लेणी आहेत. तर औरंगाबाद शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर एलोरा (वेरुळ) लेणी आहेत. वेरुळ येथील कैलास लेणे हे आधी कळस आणि मग पाया या प्रकाराने तयार करण्यात आले आहे. एका मोठ्या दगडात शिवमंदिर कोरण्यात आले आहे. ही लेणी दोन मजली असून वेरुळ येथे ३४ लेणी कोरली आहेत. अजिंठा आणि वेरुळ ही लेणी इसवीसन पाचव्या-सहाव्या शतकात कोरली गेली आहेत.


दोन्ही लेण्यांमधील कोरीव काम, भव्य मूर्ती, कोरण्यात आलेले विविध प्रसंग, बारीक प्रकारचे नक्षीकाम, चेहऱयांवरील हावभाव हे सर्व पाहून थक्क व्हायला होते. इतक्या वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक साधने नसताना तेव्हाच्या कलाकारांनी इतके प्रचंड आणि अद्वितीय असे हे काम कसे केले असेल, असा मनात विचार आला तरी थक्क व्हायला होते. मुळात असलेला डोंगर फोडून तेथे भव्य सभामंडप, गौतम बुद्धाच्या भव्य मूर्ती, अन्य देवदेवता, प्राणी, दगडात कोरणे हेच कठीण काम. किती लोक त्यासाठी राबले असतील, डोंगर कोरताना जमा झालेला निरुपयोगी माती व दगडांचा ढिगारा कसा वाहून नेला असेल, दिवसभर ही मंडळी कशी काम करत असतील, तेथेच की दुसरीकडे राहात असतील, असे अनेक प्रश्न मनात उमटतात. लेणी कोरणाऱया अनेक पिढ्या येथेच राहिल्या असतील. कारण अनेक वर्षे हे काम सुरु होते.सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही लेण्यांपैकी एकाही ठिकाणी किंवा लेण्यांच्या बाहेर हे काम कोणी केले,. त्या कलाकारांची नावे कोरलेली नाहीत. इतके प्रचंड आणि अद्वितीय काम कऱणाऱया या  कलाकारांनी आपली ओळख कुठेही दिलेली नाही. सर्व कलावंत अज्ञातच राहिले आहेत.  या दोन्ही ठिकाणी अनेक परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देत असतात. भारतीय शिल्पकलेचा हा अद्वितीय आणि  नेत्रदिपक अविष्कार पाहिल्यानंतर ती मंडळीही थक्क होतात. अजिंठाच्या लेण्यांमधील काही गुहांमध्ये इतक्या वर्षांनंतरही रेखाटण्यात आलेल्या काही चित्रांचे रंग ताजे आणि जसेच्या तसे आहेत. अजिंठा येथील  काही लेण्यांमध्ये प्रकाशाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे आतील सर्व चित्रे आणि दगडावर कोरलेले काम व्यवस्थीत पाहता येते. आजच्या काळातील मोठ्या नाट्यगृहात बसू शकतील एवढ्या आसनक्षमतेचे मोठमोठे हॉल आणि तेथे असलेले कोरीव दगडी खांब, कमानी, नक्षी पाहिली की मन थक्क होते.
                                                  अजिंठा लेण्यांत छतावर केलेले पेंटिंग
खरोखरच अजिंठा आणि वेरुळ लेणी हे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य म्हणावे लागेल. खरे तर या दोन्ही लेण्यांचा समावेश जगातील सात आश्चर्यात झाला पाहिजे. ते स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजेत.  
     
वेरुळ लेणी येथील दगडातील ही अप्रतिम शिल्पकला

3 comments:

 1. मस्त माहीती. मी दिवाळीच्या सुमारास इथे भेट देऊन आलो. अधीक फोटो इथे पहाता येतील -

  ReplyDelete
 2. tumcha ha lekh uttam ahe. mi hya leni 2 vela baghitlya. arthat tyala khup varshe jhali. pan tumchya lekhamule mazya athavani tajya zalya.tyabaddal dhanyavad! aso!
  verulchya lenyanmadhye KAILAS LENE navache ek lene ahe. Tyabaddal mala ase sangitale gele ki tyachya kamachi suruvat dongarachya mathyavarun keli ahe. he tyanni kase kele asel? kahi doke chalat nahi. pan ek goshta janavate ki tyveli koriv kamachi padhdhat hi khupach pragat asavi.

  ReplyDelete
 3. अनिकेत, विलास काका
  नमस्कार
  आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  शेखर

  ReplyDelete