28 March 2012

तुझ्या गळा माझ्या गळा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱयांच्या विरोधात लोकसभेतील सर्वपक्षीय खासदार एकत्र आल्याचे दिसून आले. राजकीय हेवेदावे, मारामाऱया आणि अन्य वेळी एकमेकांना पाण्यात पाहणाऱया या सर्व मंडळींनी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱयांच्या विरोधात मात्र तुझ्या गळा माझ्या गळा असे धोरण अवलंबिले आहे. आता निमित्त आहे ते अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर केजरीवाल काही चुकीचे बोलले आहेत, असे वाटत नाही. उलट ते सत्य बोलले असून सत्य हे नेहमीच कडवट असते.

संसदेमध्ये निवडून आलेल्या खासदारांमध्ये अनेक सदस्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. त्यापुढे जाऊन संसद सदस्यांमध्ये चोर, दरोडेखोर अशांचा भरणा असल्याचेही ते म्हणाले होते. अशा सदस्यांची नावेही त्यांनी दिली होती. केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून संसदेतील सर्वपक्षीय खासदार चिडले असून त्यांनी अण्णा आणि त्यांच्या सहकाऱयांना समज दिली आहे. +केजरीवाल यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खासदारांची यादी तयार करून ती सर्व प्रसारमाध्यमांकडे पाठवावी आणि प्रसारमाध्यमानीही ही नावे सर्व लोकांपुढे आणावित.  

संसदेतील खासदार हे आपल्या लोकशाहीतील सर्वोच्च पद आहे, येथे निवडून जाणारी व्यक्ती किमान पदवीधर, सुशिक्षित, अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याची असावी, अशी अपेक्षा मतदारांनी ठेवली तर त्यात काही चूक आहे, असे वाटत नाही.पण प्रत्यक्षात तसे घडते का, काही अपवाद वगळता केवळ पैसा आणि बाहूबल असलेल्या उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. प्रामाणिक कार्यकर्ता मागे राहतो. निवडून येऊ शकणारा आणि हवे तितके पैसे फेकणारा असा निकष उमेदवारी देताना लावला जातो. असाच प्रकार ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळेसही होतो.

नगरसेवक /आमदारकीच्या निवडणुकीत अशा गुन्हेगार मंडळींना उमेदवारी दिली जाते आणि ते निवडूनही येतात. स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होतो. गुंड, गुन्हेगार प्रवृत्ती असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि त्याविरोधात कोणी ओऱड केली तर त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत, जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत त्यांना गुन्हेगार कसे म्हणता येईल, असा युक्तीवाद राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केला जातो. काही वेळेस विरोध मोडून काढून, साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्याच माणसाला उमेदवारी दिली जाते. मतदार, प्रसारमाध्यमे काही दिवस ओरड करतील आणि नंतर सर्व काही शांत होईल, मतदार विसरून जातील, याची पक्की खात्री या राजकीय नेत्यांना असते आणि तसेच घडते.

निर्लज्ज आणि कोडगे झालेले राजकीय पक्ष, त्यांचे नेते सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरतात आणि आपणही जाऊ दे, आपल्याला काय त्याचे असे म्हणून सोडून देतो. सुशिक्षित समाज तर मतदानासाठीही घराबाहेर पडत नाही. सुट्टी मिळाली की मजा करायला बाहेर जातो. मतदान हे आपले कर्तव्य आणि अधिकार आहे. त्या माध्यमातून आपण प्रामाणिक, सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून दिले पाहिजेत. एका निवडणुकीतून हा बदल घडणार नाही. त्यात सातत्य ठेवावे लागेल. अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी नकारात्मक मतदानासाठी प्रयत्न करत आहेत. दिलेल्या उमेदवारांपैकी आम्हाला कोणीही पसंत नाही. असा एक पर्याय मतदान यंत्रावर असलाच पाहिजे आणि त्यासाठी जे मतदान होईल, त्याचीही नोंद घेतली जाणे आवश्यक आहे.

अर्थात निवडणूक प्रक्रियेत अशा सुधारणा करणे हे संसदेच्या पर्यायाने सर्वपक्षीय खासदारांच्याच हातात आहे. आणि अशा चांगल्या गोष्टींना ते कधीही तयार होणार नाहीत. त्यासाठी जागरूक मतदारांचाही दबावगट तयार झाला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणि चांगले बदल घडवून आणण्यासाठी जी मंडळी किंवा संस्था/संघटना प्रयत्न करत आहेत, त्यांची चेष्टा न करता, किंवा असे करून काही होणार आहे का, असा नकारात्मक विचार न करता, अशा प्रयत्नांना आपणही पाठिंबा दिला पाहिजे.  

1 comment:

  1. अण्णा आणि कंपनी भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याऐवजी चिखलफेकीतच दंग आहे.

    ReplyDelete