27 March 2012

कवी ग्रेस आणि आकाशवाणी


कविता आणि ललित लेखनाने मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवलेले साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी ग्रेस यांच्या निधनाच्या बातमीला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरील दुपारच्या प्रादेशिक बातम्यांमध्ये अखेरचे स्थान मिळाले. कवी ग्रेस यांची कविता सर्वसामान्यांना समजण्यास कठीण असली तरी त्यांच्या काही कवितांना गाण्याचे कोंदण लाभल्यामुळे त्या कवितांची गाणी लोकप्रिय झाली. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’, ‘भय इथले संपत नाही’, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ ही त्याचीच काही उदाहरणे.
 ‘प्रादेशिक बातम्या’ या शब्दातूनच या बातमीपत्रात महाराष्ट्र, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींना प्राधान्याने स्थान असावे, अशी अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित करण्यात येतात व त्याला मोठा श्रोतृवर्ग आहे. 
ग्रेस यांच्या निधनाच्या वृत्तानंतर खासगी मराठी वृत्तवाहिन्यांनी ‘ब्रेकिंग न्यूज’ किंवा ‘महत्त्वाचे’ म्हणून ग्रेस यांच्या निधनाची बातमी चालविणे सुरू केले. ग्रेस यांच्या कविता, कवितांची झालेली गाणी, ग्रेस यांच्याविषयी मान्यवरांची श्रद्धांजली असे त्याचे स्वरूप होते. खासगी वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रांच्या ई-आवृत्त्यांमधून ही महत्त्वाची बातमी ठरल्याने अनेकांपर्यंत ती पोहोचलीही होती. त्यामुळे दुपारच्या प्रादेशिक बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ग्रेस यांच्या निधनाची बातमी ठळकपणे सांगितली जाईल, अशी अपेक्षा होती. 
पण सर्वप्रथम पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा कोरिया दौरा, राज्याचा अर्थसंकल्प, नाशिकमध्ये घरात घुसलेला बिबटय़ा आणि अन्य काही बातम्या व त्यानंतर ग्रेस यांच्याबाबतची शेवटची बातमी होती. त्यामुळे आकाशवाणीने ‘चटावरले श्राद्ध’ उरकल्याची प्रतिक्रिया श्रोते आणि ग्रेसप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २७ मार्च २०१२ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे) 

No comments:

Post a Comment