30 November 2009

ऑफर्सच्या जाळ्यात ग्राहकांचा मामा

सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे.  जो बोलेल त्याची मातीही विकली जाईल आणि बोलणार नाही, त्याचे सोनेही विकले जाणार नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आपल्या मालाची तडाखेबंद विक्री करण्यासाठी किंवा आपल्या कंपनीच्या योजनांकडे ग्राहकांनी वळण्यासाठी आकर्षक ऑफर्स देण्यात येतात. जो  बोलबच्चनगिरी करतो, मोठ्या प्रमाणात जाहिराती करुन स्वताचे ढोलताशे वाजवतो त्या कंपनीच्या मालाकडे/ योजनांकडे ग्राहक वळतात. फक्त वस्तूंसाठीच नव्हे तर अन्य काही योजनांही आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.  हे सगळे करताना संबंधित कंपन्या, व्यापारी यांचे उखळ  पांढरे होते आणि या ऑफर्सच्या जाळ्यात गुरफटून ग्राहकांचा मामा होतो.


विविध वाहिन्यांवरुन सुरु असलेल्या रिअॅलिटी शो किंवा गाण्यांच्या स्पर्धेसाठी महाअंतिम फेरीतील विजेता निवडण्यासाठी एसएमएस मागवले जातात. या कार्यक्रमांचे लाखो प्रेक्षक आपल्या आवडत्या गायकासाठी एसएमएस पाठवतात. मात्र या सगळ्याचा ती वाहिनी आणि एसएएमएस कंपनी यांनाच प्रचंड फायदा होतो. स्पर्धा संपल्यानंतर जो निकाल लागतो, तो अगोदरच ठरवलेला असतो, हे ही आता सगळ्यांना माहिती झालेले आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रेक्षक यात गुरफटत जातो. एसएमएस करुन आपले पैसे घालवतो आणि इतरांना फायदा करुन घेतो.


एका शर्टवर दोन शर्ट फ्री, एका पॅन्टवर दोन पॅन्ट फ्री किंवा अमूक एका वस्तूवर तमूक फ्री अशाही जाहिराती आपल्या वाचनात येतात. त्यालाही आपण बळी पडतो. कारण मूळातच एका शर्टाची किंमत वाढवून ठेवलेली असते. ते आपल्या लक्षात येत नाही. एकावर एक  किंवा दोन फ्री मिळणार म्हणून आपण ते खरेदी करतो. बरे आपल्याला आत्ता खरोखऱच इतक्या शर्टची गरज आहे का, याचाही सारासार विचार आपण करत नाही. म्हणजे कधीकधी गरज नसतानाही ऑफर्स दिली आहे म्हणूनही खरेदी केली जाते.


अनेकवेळा स्टॉक क्लिअरिंग सेलच्या नावाखाली आकर्षक ऑफर्स देऊन जुना माल विकला जातो. काही जणांचा अपवाद वगळता अन्य ग्राहकांच्या पदरी निराशाच येते. कारण दुकानातून किंवा प्रदर्शनातून वस्तू किंवा कपडे घरी आणल्यानंतर त्या वस्तूतील किंवा कपड्यातील खोट लक्षात येते. पण तोपर्यंत आपण फसले गेलेलो असतो. एक महिन्यात/ वर्षात दुप्पट अशा पैशांच्या योजनांमधूनही सर्वसामान्य आणि सुशिक्षित लोकही पैसे गुंतवतात. काही जणांना सुरुवातीला आश्वासन दिलेली रक्कम मिळते. नंतर मात्र संबंधित कंपनीची लोक गाशा गुंडाळून पसार होतात आणि हजारो, लाखोंची रक्कम गुंतवलेल्या ग्राहकांना कंगाल व्हायची वेळ येते.   


मेगा ऑफर, मास्टर-ब्लास्टर ऑफर, पुन्हा अशी संधी येणार नाही, आला नाहीत तर पस्तावाल असे शब्दांचे खेळ करुन ग्राहकांना भुलवले जाते. पर्यटन कंपन्याही यात मागे नाही. मुळात आपण जर आपले स्वताचे नियोजन करुन प्रवासाला गेलो तर पर्यटन कंपन्यांनी दिलेल्या ऑफरपेक्षाही स्वस्तात आपली ट्रीप पार पडते. पर्यटन  कंपन्या ऑफर देताना अमूक एका तारखेपर्यंत नोंदणी केली तर इतक्या हजार रुपयांची सवलत, अशा जाहिराती करत असतात. म्हणजेच हजारो रुपयांची सवलत देऊनही कंपन्याना फायदा होणारच असतो. मग सवलत देण्यापूर्वीचे जे दर प्रवाशांना लावण्यात आले असतात तेव्हा या पर्यटन कंपन्यांनी ग्राहकांना किती लुबाडले असेल, याचा विचार आपण कधी करतो का.


असाच प्रकार सेलचाही असतो. मुळातच सेलमध्ये वस्तू, कपडे यांच्या किंमती वाढवून ठेवलेल्या असतात. सेलच्या किंवा आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली संबंधित दुकानदार, सेलचे आयोजक ग्राहकांना लुबाडतच असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मंडळी धंदा करायलचा बसलेली आहेत. ते सर्व धंदेवाईक आणि व्यापारी असल्यामुळे ते आपले नुकसान कधीही करुन घेणार नाहीत. नुकसान सोसून एखाद्याला अव्वाच्या सव्वा द्यायला किंवा पैसे कमी करण्याच्या नावाखाली प्रवास घडवायला ती मंडळी साधूसंत किंवा धर्मादाय संस्था नाहीत. त्यामुळे अशा अशा कोणत्याही ऑफर्स म्हणजे ग्राहकांना लुटण्याचे आणि मामा करण्याचे नवनवे प्रयोग आहेत, ही खुणगाठ प्रत्येकानेच मनाशी बांधावी.                    

2 comments:

  1. छान मुद्दा मांडलात.

    पण नाण्याला जश्या दोन बाजु असतात तश्या ह्यालासुध्दा आहेत. जाहीरातींमुळेच ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध झाले. पुर्वी बाजारात एखाद-दुसऱ्या उत्पादनाचीच मक्तेदारी असायची कारण बाकीची उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचायचीच नाहीत. हे शक्य झाले ते जाहीरातींमुळेच. ग्राहकराजा ट्रॅडीशनल गोष्टींना चिकटुन न रहाता नव-नविन उत्पादनाची मागणी करु लागला. अनेक उत्पादन बाजारात उपलब्ध झाल्यामुळे जो तो आपल्या मालाच्या गुणवत्तेकडे आणि किंमती कमी ठेवण्याकडे कटाक्षाने लक्ष देऊ लागला ज्याचा फायदा अर्थातच ग्राहकाला झाला. फसणाऱ्या ग्राहकांचा जसा एक समुह आहे, तसाच चोखंदळ ग्राहकांचाही. चार ठिकाणी चौकशी केल्याशिवाय, दोन लोकांचे अनुभव ऐकल्याशिवाय हा ग्राहक वस्तु खरेदी करत नाही. ह्या मुद्याचा विचार केला तर जाहीराती ह्या एका अर्थाने वरदानही ठरु पहात आहेत.

    आजचे युग हे जाहीरातींचे युग आहे. जाहीराती ह्या शाप असल्या काय किंवा वरदान ठरल्या काय, त्याचा प्रभाव आपण टाळु शकत नाही. फक्त ज्याने त्याने ह्या जाहीरातींच्या लाटेबरोबर वहावत जायचे, का त्या लाटेवर आरुढ होऊन स्वतःचा फायदा करुन घ्यायचा हे योग्य दृष्टीकोन ठेवुन ठरवायला हवे.

    ReplyDelete
  2. अनिकेत,
    लेखावरील सविस्तर प्रतिक्रिया मिळाली. धन्यवाद. आपला मुद्दा बरोबर आहे. जाहिरातींमुळे ग्राहकांना पर्याय निर्माण झाला आणि त्याला चोखंदळपणे निवड करणे शक्य झाले हे मान्य. माझा आक्षेप आहे तो फसव्या आणि ग्राहकांना जाळ्यात ओढणाऱया योजना व जाहिरातींबाबत. वृत्तपत्रातून अनेकदा या संदर्भात बातम्या येत असतात. तसेच ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱयांचे मार्गदर्शन करणारे लेखही येत असतात. असो.
    आपल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete