01 January 2010

थर्टी फर्स्टचा सोहळा की झिंग

नमस्कार, आज १ जानेवारी २०१०. इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा जोशीपुराण या माझ्या ब्लॉगवर नवे लेखन केले नव्हते. डिसेंबर महिन्यात सुट्टीवर असल्याने डोंबिवली बाहेर जाणे झाले होते. त्यामुळे लेखन केले गेले नाही. १८ डिसेंबरला मी शेवटचा लेख लिहिला होता. त्यानंतर काहीच लिहिणे झाले नाही.



गेल्या काही वर्षांपासून थर्टी फर्स्ट साजरी करण्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मला वाटते २१ ड़िसेंबरचे हे महत्व वाढविण्यात काही प्रमाणात प्रसार माध्यमेही कारणीभूत आहेत. नाहीतर आपल्या कुटुंबापुरता किंवा आपण राहतो त्या सोसायटीपुरता मर्यादित असणारा ३१ डिसेंबर आज जणू काही वर्षाच्या अखेरीचा महत्वाचा आणि साजरा केलाच पाहिजे, असा एक सण झाला आहे. सध्या सगळीकडे मार्केटिंग आणि शो बिझनेसचे महत्व वाढले आहे. जे असेल ते कॅश करायचे ही वृत्ती वाढत चालली असून त्यातूनच मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी थर्टी फर्स्टला एका वेगळ्या पातळीवर नेऊन टाकले आहे. थर्टी फर्स्ट म्हणजे एक सोहळा झाला आहे.


थर्टी फर्स्ट म्हणजे फक्त खाणे, दारु पिणे, नाचणे आणि धम्माल करणे असा अलिखित नियम झाला आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असताना दरवर्षीचे तेच रटाळ कार्यक्रम पाहात आणि त्यांना नावे ठेवत घराघऱांमध्ये ३१ डिसेंबर साजरा केला जायचा.  आता घरातील ३१ डिसेंबर हा रस्त्यावर आणि गल्लीत आला आहे. ३१ डिसेंबर साजरा करताना अनेक जण भानावर नसतात. गर्दीच्या ठिकाणी किंवा विविध चौपाट्या या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी उसळलेली असते. जणू काही त्या दिवसापुरते सर्व प्रश्न, काळज्या मिटलेल्या असतात, असे वातावरण असते. अर्थात याला काही अपवादही असतात. केवळ मौज-मजा न करता काही विधायक काम करुन थर्टी फर्स्ट साजरी करत असतात. अशा वेगळ्या प्रयत्नांचे आणि उपक्रमांचे नक्कीच कौतुक करायला पाहिजे.


थर्टी फर्स्ट साजरा करावा की करु नये यावर वाद-प्रतिवाद होऊ शकतो. प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. थर्टी फर्स्टला उत्तर म्हणून काही मंडळींनी गुढीपा़व्याच्या पूर्वसंध्येला (हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र पाडवा) असे सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. थर्टी फर्स्ट हा सोहळा म्हणजे नुसते फॅड असून केवळ प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या भूलभूलय्यामुळे त्याचे महत्व अतोनात वाढले आहे असे मला वाटते. थर्टी फर्स्टच्या रात्री जे काही घडते त्याचे वृत्तान्तही दुसऱया दिवशी वृत्तपत्रातून येत असतात आणि ते आपल्यासाठी काही भूषणावह नसतात. अर्थात थर्टी फर्स्ट साजऱया होणाऱया सर्वच ठिकाणी असे काही घडते असे नाही. कदाचित घडत असले तरी सगळ्याच घटनांना प्रसिद्धी मिळत नसेल.   


असो. आपल्याकडे आता सगळे सण आणि समारंभांचे इव्हेंट झाले आहेत. गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाचेच पाहा ना. सगळ्यात उंच हंडी लावून आणि भरमसाठ बक्षिसे ठेवून दरवर्षी दहीहंडी उंचच उंच बांधली जात आहे.दहीहंडी फोडताना काही युवक, मुले जखणी होत आहेत तर काही मृत्यूमुखी पडत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यांचेही तसेच झाले आहे. सणांच्या नावाखाली त्यांचे झालेले व्यापारीकरण आणि त्यात होणारे गैरप्रकार याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जाते. या सणांप्रमाणेच थर्टी फर्स्टचे झाले आहे. आपण त्यात किती वाहावत जायचे हे प्रत्येकाने स्वताशी ठरवावे.      

3 comments:

  1. स्वता काही घडविण्याचा प्रयत्न केल्याखेरीज काही घडू शकत नाही याचे भान न ठेवल्याने असे घडते

    ReplyDelete
  2. > थर्टी-फर्स्टला उत्तर म्हणून काही मंडळींनी गुढीपा़डव्याच्या पूर्वसंध्येला (हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र पाडवा) असे सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे.
    >----

    ही एक संघीय बावळट पद्‌धत आहे. म्हणजे तिला रा स्व संघाचा अधिकृत पाठिंबा नाही, पण संघधार्जिणे लोक हे प्रकार करतात. परकीय लोक ३१-१२ ला दिखाऊपणा करतात का? बहुतेक भारतीयांची त्यावरची प्रतिक्रिया म्हणजे स्वत: तसाच बावळटपणा करणे. संघवाले स्वत:ला संस्कृतीचे पाईक समज़तात, म्हणून ते तसलेच अंधानुकरण करतात, मात्र फाल्गुन अमावस्येला, हे एक वेगळेपण. हे ही नसे थोडके. त्या संध्याकाळी काहीही करण्याची परंपरा नाही, हे विसरल्या ज़ाते. आपली परंपरा गुढी उभारण्याची. (मी तीदेखील पाळत नाही, हा भाग वेगळा.) मी गेल्या पंचवीस वर्षात एकदाच ३१-१२ ला एकाकडे 'टी व्ही पाहणार नाही', 'कोणीही नाचणार नाही', 'भारतीय खाद्‌यपदार्थ' बोलीवर गेलो. आग्रहाखातर थोडं मद्‌य प्यालो, उत्तम दोसा खाल्ला. पण दोसा मिळण्याच्या आधी माझ्या चषकात दुसर्‍यांदा फाजिल आग्रह करून ओतलेली वाईन फेकून दिली. नन्तर मला तो मित्र बरेच दिवस शिव्या देत असे. पण त्यानी त्या संध्येचं रूप विलायती ठेवलं नव्हतं, हे मात्र खरं. 'नेहमी भेटतोच तसे आज़ही भेटू' म्हणाला आणि शब्दाला ज़ागला.

    ३०-४० वर्षांचे लोक आपल्या आईबापांनाही बिघडवताहेत. 'मदर्ज डे, फ़ादर-ज डे' वगैरेला भारतात या असल्या फालतू भानगडी माहीतदेखील नसलेल्या आपल्या घरच्यांना फोन करताहेत, आणि त्यांच्या डोक्यात अनावश्यक आणि दिखाऊ माहिती भरताहेत. अमेरिकेला शिव्या देणारा हिंदु माणूसही किती मूर्ख आहे आणि अंधानुकरणी आहे, याची ही एक झलक.


    > आज १ जानेवारी २०१०. इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस.
    >
    हे ख्रिस्ती नववर्ष आहे हो; ते 'इंग्रजी' नाही, 'इटालियन' नाही, 'स्पॅनिश' नाही. २०१० हे इं(ग्रजी) शके नाही, तर इ(सवी) शके/सन आहे. की कालगणना सौर असल्यामुळे तो 'सन' म्हणजे बहुतेक 'Sun' असावा.

    तुम्ही नेहमीप्रमाणेच छान लेख लिहिला आहे.

    ReplyDelete
  3. tumcha 31Dec varil lekh vachala ani mazya new years wish la tumcha uttaracha sms cha arth kalala. Pan me mhanato apan jar ka pushkal goshti engrajanchya pramane karato tar he pan karayala kay harkat asavi. ha, tytil vait goshti sodun dyavyat pan changlya goshtinche anukaran karu naye ashi apli sanskruti pan sangat nahi. tevha,ugach apli sanskruti che evhade stom majvanyachi kay garaj mhanato mi!!!

    ReplyDelete