20 January 2010

मिलिंद गुणाजी आता साईबाबांच्या भूमिकेत

मराठी-हिंदी मालिका किंवा चित्रपटांमधून खलनायक साकारणारा मिलिंद गुणाजी आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका हिंदी चित्रपटात ‘श्री साईबाबा’ साकारत आहे. लंडन येथील एस. सत्यप्रकाश यांची निर्मिती असलेला हा चित्रपट शिर्डीच्या साईबाबांवर आहे. एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार होणाऱ्या या चित्रपटात मिलिंद गुणाजी साईबाबाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. खुद्द मिलिंद गुणाजी यांनीच ही माहिती दिली. अभिनेता म्हणून परिचित असलेल्या मिलिंदची खरी ओळख ही ट्रेकर- हायकर आणि भटकंतीकार म्हणून आहे. परंतु अभिनयाच्या क्षेत्रात येऊनही त्याने आपले निसर्ग, गड, किल्ले आणि भटकंतीवरील प्रेम आजही जपले आहे. जाहिराती, मालिका आणि चित्रपटाच्या चित्रिकरणातून वेळात वेळ काढून तो आपली ही आवड जोपासत आहे.



माझी मुलुखगिरी, भटकंती, चला माझ्या गोव्याला, गुढरम्य महाराष्ट्र अशी मराठी पुस्तके तसेच ऑफ बीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र हे इंग्रजी पुस्तक त्याच्या नावावर जमा आहे. आता त्यांने लिहिलेले ‘मिस्टिकल, मॅजिकल महाराष्ट्र’ हे नवे पुस्तक येत्या २९ जानेवारीला मुंबईत क्रॉसवर्ड, वांद्रे येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, अभिनेते देवानंद, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित होत आहे. पॉप्युलर प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईत महाल्क्ष्मी येथील पॉप्युलर प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात अनौपचारिक गप्पा करताना त्यांने आपण साईबाबा साकारत असल्याची माहिती दिली.


एस. प्रकाश यांना मी मालिका किंवा चित्रपटातून खलनायकी भूमिका करतो, हे काही जणांनी सांगितले. अशा भूमिकांचा शिक्का बसलेल्या अभिनेत्याने साकारलेला ‘साईबाबा’ प्रेक्षक स्वीकारतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. पण त्यांनी ही भूमिका मिलिंद गुणाजीच करेल, असे सांगून माझ्यावर विश्वास टाकला. काही काही योग असतात. त्यामुळे मला साईबाबा साकारायची संधी या चित्रपटामुळे मिळाल्याचे सांगून चित्रपटाचे सुमारे साठ टक्के चित्रिकरण पूर्ण झाले असल्याचेही मिलिंदने सांगितले.

‘मिस्टिकल, मॅजिकल महाराष्ट्र’ या पुस्तकाविषयी अधिक माहिती देताना त्याने सांगितले की, महाराष्ट्रातील गुढरम्य आणि चमत्कारिक स्थळांची माहिती आपण या पुस्तकात दिली आहे. माझ्या भटकंतीमध्ये मला राज्यात अशी अनेक स्थळे आणि ठिकाणे आढळली. त्या प्रत्येक ठिकाणाशी काही दंतकथा किंवा चमत्कार निगडित आहेत. मी स्वत: त्याचा अनुभव घेतला आहे. याला अंधश्रद्धा म्हणायचे की त्यामागील कार्यकारण किंवा विज्ञान शोधायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला जे दिसले, अनुभवायला मिळाले ते मी या पुस्तकात मांडले आहे.पुणे-सोलापूर रस्त्यावर यावत या ठिकाणी भुलेश्वर हे देऊळ आहे. या ठिकाणी शंकराची पिंड असून तेथे नैवेद्य म्हणून पेढे ठेवले की त्यातील काही आपोआप कमी होतात. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. नांदेड येथे एक दर्गा असून तेथे स्वर येणारे दगड (सुरीला पाषाण) आहेत. त्या दगडांवर आघात केला की ‘सारेगमपधनीसा’हे स्वर ऐकू येतात. पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोकण, उत्तर कोकण, दमण-दीव, लोणावळा, खंडाळा कर्जत, मुरबाड, नाशिक, सातारा, धुळे, अमरावती आदी परिसरातील विविध ठिकाणांचा यात समावेश आहे.


काही वर्षांपूर्वी ‘झी मराठी’ या वाहिनीवर झालेली ‘भटकंती’ ही मालिका खूप गाजली. आजही त्याचे जुने भाग प्रसारित करण्यात येत असतात. झी मराठीसाठीच मी आणि संतोष कोल्हे ‘डिस्कव्हर महाराष्ट्र’ ही नवी मालिका करतोय. पुढच्या आठवडय़ात आम्ही या मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात करत आहोत. ‘भटकंती’ मालिकेतून यापूर्वी येऊन गेलेल्या एक-दोन ठिकाणांचा अपवाद वगळता यात सर्व नवीन ठिकाणे असतील. महाराष्ट्रातील किल्ले, सागरी किल्ले, जंगले, समुद्रकिनारे अशा ठिकाणांचा यात समावेश असेल, असेही त्यांने सांगितले.

सध्याच्या तरुण पिढीमध्ये गड, किल्ले तसेच भटकंतीविषयी आवड निर्माण झालेली आहे. अनेक तरुणांचे ग्रुप शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी भटकंतीला बाहेर पडत असतात. त्यांच्यातील ही आवड नक्कीच कौतुकास्पद आहे. येत्या काही महिन्यात ‘खट्टामिठा’, ‘इडियट बॉक्स’ हे हिंदूी तर
 ‘जयमल्हार’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचेही त्यांने सांगितले.
 
 
माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२० जानेवारी २०१०, पान एक)  प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41258:2010-01-19-15-23-43&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

2 comments:

  1. ही भटकंती ची ठिकाणे इंटरनेट वर कुठे अवेलबल आहेत का ? अर्थात पुस्तक वाचता येईळच .. पण इंटरनेट वर असतील तर त्याला भेट देणारी मंडळी खूप असतील हे खरे :-) असो, महेश

    ReplyDelete
  2. महेश
    नमस्कार.
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. मिलिंद गुणाजी यांची पुस्तके वेबसाईटवर आहेत किंवा त्यांची वेबसाईट आहे की नाही त्याची कल्पना नाही. मी चौकशी करुन कळवतो. पण तुम्ही गुगलला सर्च देऊन बघा. कदाचित सापडू शकतील.

    ReplyDelete