08 March 2012

हरवलेली रंगपंचमी

होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीनही उत्सव वेगवेगळे आहे. मात्र आपण या तीनही उत्सवांची गल्लत करतो. वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंग उधळण्याचा कार्यक्रम असतो म्हणून ती रंगपंचमी असते. आपण हल्ली रंगपंचमी विसरून गेल्याने रंगपंचमीतील खरा आनंद हरवून बसलो आहोत. आजच्या या धुळवडीला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.


काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी प्रथा होती की फाल्गुन पौर्णिमेला होळीचे पूजन झाल्यानंतर दुसऱया दिवशी त्या होळीतील राख अंगाला लावून आंघोळ केली जायची. ही राख औषधी आणि त्वचाविकार बरे करणारी असायची. अर्धवट जळत राहिलेल्या होळीवर पाणी तापवून त्या पाण्याने आंघोळ केली जायची. होळीनंतर पाच दिवसांनी येणारा सण म्हणजे रंगपंचमी. या दिवशी परिचित,मित्रमंडळी आपापसात एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करायचे. 


मात्र गेल्या काही वर्षात रंगपंचमी ऐवजी आपण धुळवडच रंगपंचमी म्हणून साजरी करू लागलो आहोत. रस्त्यावरून जाणाऱया-येणाऱया लोकांवर घातक रसायने मिसळलेल्या रंगाचे किंवा गटाराच्या पाण्याने भरलेले फुगे/पिशव्या फेकून मारणे, रस्त्यावरून टोळक्याने अचकट-विचकट अंगविक्षेप करत फिरणे, समोरचा माणूस आपल्या ओळखीचा नसला तरी त्याच्यावर रंग टाकणे, गुलाल उधळणे, मद्यप्राशन करणे म्हणजेच धुळवड असे समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे होळीच्या दुसऱया दिवशी अर्थात धुळवडीला जणूकाही अघोषित बंद असल्यासारखी परिस्थिती असते. अनेक जण सकाळी घराबाहेर पडणे टाळतात तर दुकानदार सकाळी दुकाने बंद ठेवणे पसंत करतात.


धुळवडीच्या दुसऱया दिवशी वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवरून पाण्याने/किंवा रंगाने भरलेली पिशवी-फुगा लागल्याने कोणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत, घातक रंगांचा वापर केल्यामुळे डोळ्यांचे किंवा त्वचेचे झालेले विकार या विषयीच्या बातम्या दरवर्षी येत असतात. घातक रसायने असलेल्या रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांनी धुळवड खेळा, असा कितीही कंठशोष केला तरी अपवाद वगळता त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. आपण स्वतला सुसंस्कृत म्हणवतो आणि जे काही करतो ते योग्य आहे का याचा सर्वानीच गंभीरपणे विचार केला पाहिजे. 


एक दिवस जरा  गंमत आणि मजा केली तर काय बिघडले, असा सूर धुळवडीला रंग खेळणाऱया मंडळींकडून विचारला जातो. पण उत्सव हा आपल्या आनंदासाठी असतो. रंगाचा बेरंग होत असेल तर तो उत्सव काय कामाचा. 
          

No comments:

Post a Comment